Tuesday, November 7, 2023

छगन भुजबळांनंतर आता...विजय वडेट्टीवार यांचाही सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध ; वाचा सविस्तर ;

वेध माझा ऑनलाइन। मंत्री छगन भुजबळ यांनी आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, असे म्हटल्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे असे म्हटले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. सरसकट आरक्षण देण्यास आमचा आधीही विरोध होता आणि आत्ताही आहे. कुणबी नोंदणीचे काम शिंदे समितीला दिले आहे. ओबीसींमध्ये समाविष्ट होणाऱ्या जाती त्यांनी शोधाव्या आणि श्वेतपत्रिका काढावी.

विजय वडेट्टीवार म्हणाले, आम्ही राणे समिती स्थापन केली होती. त्यानंतर गायकवाड समिती आली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की कोणतीही जात मागास ठरवायची असेल तर त्यासाठीची प्रक्रिया आहे. ती राबवली पाहिजे. जर सिद्ध झाले की ते मागास आहेत तर त्यांना आरक्षण द्यायला कुणाचीच ना नाही. छगन भुजबळ एक भूमिका मांडत आहेत आणि शंभूराज देसाई वेगळं बोलत आहेत. असं असू नये, लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा.

वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रातील कुणबींच्या नोंदी तपासण्यात येत आहेत.आता जी मागणी करण्यात येत आहे की सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या. यावर सरकारची भूमिका काय? ते स्पष्ट झाले पाहिजे. मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढाई यांना लावायची आहे का? मी ओबीसी आहे मला हेच वाटते की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास माझा याआधीही विरोध होता आणि आत्ताही आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या विदर्भात होतात.
ते कोण आहेत? ते ओबीसी आहेत. का होतात? कारण ओबीसीमुळे सर्व काही मिळते अशा पद्धतीचे वातावरण निर्माण केले गेले.
अरे हेच समाजाला अपुरे आहे. तुम्ही येणार तर वाढवून घ्या. वेगळा प्रवर्ग घ्या.

ते पुढे म्हणाले, तुम्ही ५० टक्केच्या आतमध्येची मागणी करताय. हा निर्णय सरकारने जाहीर केलाय. मग वाढवून द्या.ओबीसी समाजाला दुखवू नका. मराठा समाजालाही दुखवू नका. गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा अशी आमची
देखील भूमिका आहे. सरकार म्हणून जी भूमिका मांडायला हवी ती मांडताना दिसत नाही.

No comments:

Post a Comment