वेध माझा ऑनलाइन। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांनी ऐन दिवाळीत राजकीय फटाके फुटलेले अवघा महाराष्ट्राने पाहिले आहेत. खासदार गजानन किर्तिकर आणि रामदास कदम यांनी एकमेकांवर गद्दारीचे आरोप केल्यामुळे हे प्रकरण आता हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. आता यावर पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मार्ग काढावा अन्यथा मला मला गजाभाऊंशी वेगळ्या भाषेत बोलावं लागेल, असा इशाराच रामदास कदम यांनी दिला आहे. त्यामुळे शिंदे गटात ‘ऑल इज वेल’ नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी निमित्त ठरले आहे ते मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे. आता यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसा मार्ग काढणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
किर्तिकर-रामदास कदम यांच्यातील वाद
काही दिवसांपूर्वी किर्तिकर यांनी, आपण आता थकलो असून पुढील लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर ‘किर्तिकर लोकसभा लढवणार नसतील तर माझे दुसरे चिरंजीव सिद्धेश कदम हे येथून निवडणूक लढवण्यास तयार आहेत, अशी घोषणाच रामदास कदम यांनी केली होती. त्यानंतर किर्तिकरांनी आपण ठणठणीत असून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. यावरून रामदास कदम यांनी किर्तिकरांना टार्गेट करत ते पक्षाशी गद्दारी करत असल्याचा आरोप केला होता. शिवाय ठाकरे गटात असलेल्या त्यांच्या मुलाला निवडून आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचा सूर लावला होता.
किर्तिकरांची प्रेसनोट
रामदास कदम यांनी गद्दारीचा आरोप केल्यानंतर किर्तिकरांनीही पलटवार केला आहे. रामदास कदम यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायचा होता, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. राष्ट्रवादीत जाण्यासाठी रामदास कदम यांनी शरद पवारांबरोबर खेड-पुणे केलेला प्रवास सर्वांना ठावूक असल्याचा टोलाही किर्तिकरांनी लगावला. म्हणूनच कदम यांनी गद्दारीबद्दल बोलू नये, असे कीर्तिकर यांनी काढलेल्या प्रेसनोटमध्ये नमूद केले आहे. एवढेच नाही १९९० मध्ये रामदास कदम यांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही किर्तिकरांनी केला आहे.
रामदास कदम यांनी काढले किर्तिकरांचे वय
गजानन किर्तिकर यांनी केलेल्या आरोपांनंतर रामदास कदम देखील आक्रमक झाले आहेत. ‘गजाभाऊंचं वय जास्त झालंय, मला वाटतं त्यांना डॉक्टरांची गरज आहे’ या शब्दांत रामदास कदम यांनी किर्तिकरांचा समाचार घेतला आहे. गजाभाऊ आपल्याच पक्षाच्या नेत्याविरोधात प्रेसनोट काढून बेछूट आरोप करतात, हे अयोग्य असल्याचेही कदम यांनी सुनावले आहे.
१९९० मध्ये मला खेड, रत्नागिरीमधून तिकीट देण्यात आले होते. मग मी मुंबईत गजाभाऊंना पाडायला कसा येणार? शिवाय गजाभाऊंना हे ३३ वर्षांनंतर कळले का? असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केला. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी यात हस्तक्षेप करावा, अन्यथा यापुढे मला गजाभाऊंशी वेगळ्या भाषेत बोलावं लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, माझ्या रक्तात भेसळ नाही. पक्षाशी गद्दारी तुम्ही करताय. कुणाला कसे बदनाम करायचे, हे गजाभाऊंकडून शिकावे, या शब्दांत त्यांनी गजानन किर्तिकरांना फटकारले.
उद्धव ठाकरेंवर आरोप
२००९ मध्ये उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून अनंत गिते यांनी मला गुहागरमध्ये पाडले, असाही आरोप रामदास कदम यांनी केला आहे. शिवाय आपल्याला हेलिकॉप्टर, विमान देऊन खेडसोडून राज्यात प्रचारासाठी पाठवले, असेही रामदास कदम म्हणाले.
No comments:
Post a Comment