पावसाने पाठ फिरवली... पिकांचे नुकसान झाले... आणि आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कराड तालुक्यातील आवश्यक मंडलांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कराड तालुक्यातील कमी पाऊस झालेल्या व पिकांचे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी करत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची तसेच पिकांच्या नुकसानीची आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मनव, साळशिरंबे, महारूगडेवाडी, बोत्रेवाडी, आकाईचीवाडी, जिंती, टाळगाव आणि घोगाव या परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
कराड तालुक्यातील ज्या मंडलांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिले असून पिकांचे नुकसान झाले आहे, त्या मंडलांचा दुष्काळी परिस्थितीत समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असल्याचे आमदार अतुल भोसले यांनी सांगितले. याबाबत ई-मेलद्वारे तसेच दूरध्वनीवरूनही मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार भोसले म्हणाले, “कराड तालुक्यात ज्या-ज्या मंडलांमध्ये पाऊस कमी झाला आहे आणि पिकांचे नुकसान झाले आहे, त्या मंडलांचा दुष्काळी परिस्थितीत समावेश व्हावा, यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. आवश्यक मंडलांचा दुसऱ्या टप्प्यात दुष्काळी म्हणून समावेश करून तेथील शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील.”
कराड दक्षिणमधील दुष्काळ परिस्थितीची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच कराड तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करावा यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले असून, दूरध्वनीवरुनही संवाद साधला आहे. यंदाच्या हंगामात भुईमूग, सोयाबीन यांसह विविध पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे संबंधित कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून, नुकसान झालेल्या पिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण व पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कराड तालुक्यात ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी राहिले आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या भागांचा दुष्काळ परिस्थितीच्या निकषांत समावेश करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जात आहे. दुष्काळ परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी आणि नुकसानग्रस्त पिकांचे योग्य सर्वेक्षण होऊन शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आमदार डॉ. भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी पंकज पाटील, प्रविण साळुंखे, निळकंठ शेडगे, तानाजी चवरे, धोंडीराम चोरगे, मच्छिन्द्र साळुंखे, जयवंत शेवाळे, संतोष पाटील, दत्तात्रय पाटील, दादासो शेवाळे, संताजी शेवाळे, अशोक पाटील, जयसिंग जाधव, सागर जाधव, रविंद्र सपकाळ, निवास शेवाळे, संदीप भावके, दिलीप सूर्यवंशी, निवास जाधव, सचिन बागट, हंबीराव पाटील यांच्यासह उंडाळे मंडल कृषी अधिकारी सपना देव्हारे, उपकृषी अधिकारी विशाल जगदाळे, बाबा तोरणे, अश्विनी कुबडे, रोहित शिगावकर आदी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते
शेतकऱ्यांच्या... नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी;
आमदार अतुल भोसले यांनी आज दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसाचे प्रमाण, पिकांची स्थिती आणि झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी घेतली.
त्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले
शेतकऱ्यांवर आलेल्या या कठीण परिस्थितीत त्यांना एकटे सोडले जाणार नाही. पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना न्याय्य मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू. पाण्याचे व्यवस्थापन आणि भविष्यातील पीक नियोजनाबाबतही संबंधित विभागांसोबत चर्चा करण्यात येईल असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment