सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर अवघ्या चार दिवसांनी गंभीर स्वरूपाचा पल्मनरी एम्बोलिझम झालेल्या 20 वर्षीय महिलेवर कराड येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले. सुरुवातीला या महिलेला पायात तीव्र वेदना जाणवत होत्या. त्यानंतर तिला चक्कर येणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. पुढील तपासणीत डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) असल्याचे आढळून आले. हा रक्ताच्या गुठळ्यांचा अडथळा फुफ्फुसांपर्यंत पोहोचून पल्मनरी एम्बोलिझममध्ये रूपांतरित झाला होता. दोन्ही फुफ्फुसांमधील अनेक रक्तवाहिन्यांमध्ये मोठ्या रक्ताच्या गुठळ्यांमुळे अडथळा निर्माण झाला होता. या स्थितीमुळे हृदयाच्या उजव्या बाजूवर मोठा ताण आला होता. उजव्या हृदयाच्या कप्प्याची कार्यक्षमता गंभीररीत्या कमी झाली होती, ट्रायकस्पिड झडपेत लक्षणीय गळती होती आणि फुफ्फुसांकडे रक्त नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील दाब धोकादायक पातळीवर वाढला होता.
अलीकडेच झालेल्या सिझेरियन शस्त्रक्रियेमुळे उपचार अधिक आव्हानात्मक झाले होते. शस्त्रक्रियेनंतर लगेच रक्ताच्या गुठळ्या विरघळविणारी औषधे दिल्यास मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होण्याचा धोका होता. पल्मनरी एम्बोलिझमची तीव्रता, रक्ताच्या गुठळ्यांचे मोठे प्रमाण आणि हृदयावर आलेला ताण लक्षात घेऊन वैद्यकीय पथकाने दोन्ही फुफ्फुसांमधील रक्ताच्या गुठळ्या काढण्यासाठी आणि फुफ्फुसांमधील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन द्विपक्षीय पल्मनरी थ्रोम्बेक्टॉमी करण्याचा निर्णय घेतला.
गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरचा काळ यामध्ये शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढतो. यामध्ये डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) आणि पल्मनरी एम्बोलिझम यांचा समावेश होतो. विविध अभ्यासांनुसार, गर्भधारणेशी संबंधित रक्ताच्या गुठळ्यांची समस्या प्रत्येक 1,000 गर्भधारणांमागे सुमारे 0.5 ते 2 महिलांमध्ये आढळते. प्रसूतीनंतरच्या काही आठवड्यांमध्येही हा धोका वाढलेला राहतो. जागतिक आरोग्य संघटनेने सिझेरियन प्रसूतीसह काही मातृ घटकांना रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या वाढलेल्या धोक्याशी संबंधित असल्याचे नमूद केले आहे. भारतात गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरच्या काळातील रक्ताच्या गुठळ्यांशी संबंधित उपलब्ध आकडेवारी अद्याप मर्यादित आहे. मुंबईतील 34,720 गर्भवती महिलांचा समावेश असलेल्या एका संभाव्य अभ्यासात गर्भधारणेदरम्यान 32 महिलांमध्ये लक्षणांसह डीप व्हेन थ्रोम्बोसिस आढळून आला. गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर रक्ताच्या गुठळ्यांशी संबंधित गुंतागुंत ओळखण्यासाठी अधिक जागरूकता आणि वेळेवर निदानाची गरज या अभ्यासातून अधोरेखित होते.
या प्रकरणाबाबत बोलताना डॉ. अमृतराज नेर्लीकर, सल्लागार हृदय व छातीच्या रक्तवाहिन्यांचे शल्यचिकित्सक (CVTS), सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराड, मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालय, म्हणाले, “रुग्णाला आमच्याकडे अत्यंत गंभीर अवस्थेत आणण्यात आले होते. तिला मोठ्या प्रमाणात श्वास घेण्यास त्रास होत होता आणि दोन्ही फुफ्फुसांमधील रक्तप्रवाहात मोठ्या रक्ताच्या गुठळ्यांमुळे अडथळा निर्माण झाल्याचे आढळले. या पल्मनरी एम्बोलिझममुळे हृदयाच्या उजव्या बाजूवर गंभीर ताण आला होता आणि फुफ्फुसांकडे रक्त नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील दाब मोठ्या प्रमाणात वाढला होता. सिझेरियन शस्त्रक्रियेला केवळ चार दिवस झाले असल्याने रक्ताच्या गुठळ्या विरघळविणारी औषधे देताना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होण्याचा धोका होता. रुग्णाची गंभीर अवस्था आणि रक्ताच्या गुठळ्या विरघळविणाऱ्या उपचारांवरील मर्यादा लक्षात घेऊन आम्ही रक्ताच्या गुठळ्या शस्त्रक्रियेद्वारे काढण्याचा निर्णय घेतला.”
पुढे ते म्हणाले, “आम्ही द्विपक्षीय पल्मनरी थ्रोम्बेक्टॉमी केली. या प्रक्रियेदरम्यान दोन्ही फुफ्फुसांमधील अनेक भागांमध्ये आणि लहान रक्तवाहिन्यांमध्ये अडकलेल्या मोठ्या प्रमाणातील रक्ताच्या गुठळ्या काढण्यात आल्या. या गुठळ्यांमध्ये नव्याने तयार झालेल्या तसेच जुन्या गुठळ्यांचाही समावेश होता, त्यामुळे ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होती. फुफ्फुसांमधील अडथळा शक्य तितका दूर करून रक्तप्रवाह सुरळीत करणे आणि हृदयाच्या उजव्या बाजूवरील दाब कमी करणे हा या प्रक्रियेचा उद्देश होता. शस्त्रक्रियेनंतर फुफ्फुसांकडे रक्त नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील दाब लक्षणीयरीत्या कमी झाला आणि हृदयाची कार्यक्षमता सुधारली. रुग्णाला ECMOची गरज भासली नाही आणि फुफ्फुसांमधील रक्तप्रवाह पूर्ववत केल्यानंतर कोणतीही मोठी गुंतागुंत झाली नाही.”
डॉ. सुहास मुळे, कन्सल्टंट कार्डिओलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराड, मणिपाल हॉस्पिटल्सचे नेटवर्क हॉस्पिटल, म्हणाले, “थ्रोम्बेक्टॉमीनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर, पायांमधून फुफ्फुसांकडे जाणाऱ्या रक्ताच्या गुठळ्यांचा पुढील धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून इन्फिरिअर व्हेना कावा (IVC) फिल्टर बसवण्यात आला. पायातील रक्तवाहिन्यांमधून सुटणाऱ्या गुठळ्या हा फिल्टर अडवतो, त्यामुळे रुग्णाच्या पुढील उपचारादरम्यान पुन्हा पल्मनरी एम्बोलिझम होण्याचा धोका कमी करण्यास मदत होते.”
डॉ. चिन्मय एरम, हॉस्पिटल डायरेक्टर, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराड, मणिपाल हॉस्पिटल्सचे नेटवर्क हॉस्पिटल, म्हणाले, “बाळंतपणानंतर उद्भवणाऱ्या गंभीर गुंतागुंतींवर उपचार करताना वेळेत निदान होणे आणि तातडीने उपचार सुरू होणे किती महत्त्वाचे आहे, हे या प्रकरणातून दिसून येते. रुग्णाची प्रकृती गंभीर होती आणि तिच्यासाठी तातडीच्या उपचारांसोबतच विविध वैद्यकीय विभागांमधील तज्ज्ञांच्या समन्वयाची गरज होती. कार्डिओलॉजी, कार्डिओथोरॅसिक सर्जरी, इंटरनल मेडिसिन, अॅनेस्थेशिया तसेच प्रसूती व स्त्रीरोग विभागातील तज्ज्ञांच्या सहभागामुळे उपचाराच्या प्रत्येक टप्प्यावर रुग्णाला सर्वसमावेशक वैद्यकीय उपचार मिळू शकले. अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये सक्षम मल्टिडिसिप्लिनरी टीम, योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि परस्परांमधील समन्वय किती महत्त्वाचा असतो, हे रुग्णाची झालेली यशस्वी सुधारणा अधोरेखित करते.”
शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आणि तिच्या हृदयाच्या व फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेत हळूहळू सुधारणा झाली. तिची प्रकृती स्थिर राहिली आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या ती आपल्या नवजात बाळासोबत घरी असून तिची प्रकृती सुधारत आहे.
पल्मनरी एम्बोलिझम ही गंभीर वैद्यकीय स्थिती असून त्यामध्ये रक्ताची गुठळी फुफ्फुसांकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करते. गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढतो. प्रसूतीनंतर अचानक किंवा वाढता श्वास घेण्यास त्रास, छातीत अस्वस्थता किंवा दुखणे, चक्कर येणे तसेच एका पायात वेदना किंवा सूज यांसारखी लक्षणे दुर्लक्षित करू नयेत आणि अशा वेळी तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असा डॉक्टरांचा सल्ला आहे.
ही प्रक्रिया डॉ. अमृतराज नेर्लीकर, सल्लागार हृदय व छातीच्या रक्तवाहिन्यांचे शल्यचिकित्सक (CVTS); डॉ. राम देसाई, सल्लागार अंतर्गत औषधतज्ज्ञ; डॉ. सुश्रुत पाटील, सल्लागार अंतर्गत औषधतज्ज्ञ; डॉ. संदीप मोरे, सल्लागार भूलतज्ज्ञ; डॉ. सुहास मुळे, सल्लागार हृदयरोगतज्ज्ञ; आणि डॉ. वृषाली चव्हाण, सल्लागार प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या नेतृत्वाखालील बहुविशेषज्ञ वैद्यकीय पथकाने केली. या पथकाला ऑपरेशन थिएटर आणि अतिदक्षता विभागातील (ITU) सहाय्यक वैद्यकीय पथकाची साथ लाभली.
No comments:
Post a Comment