Saturday, September 26, 2026

चावडी चौकात गणेश विसर्जनाचा जल्लोष!पारंपरिक वाद्यांना नागरिकांची पसंती; हजारोंच्या गर्दीत भक्तिमय वातावरणमध्यरात्रीपर्यंत १९६ सार्वजनिक गणेश मंडळे विसर्जनासाठी रवाना; पहाटेपर्यंत ‘मोरया मोरया’चा जयघोष

वेध माझा ऑनलाईन
 ढोल-ताशांचा निनाद, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, गुलालाची उधळण आणि भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात कराड शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीने उत्साहाचे शिखर गाठले. चावडी चौकातून प्रीतिसंगम घाटाकडे जाणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत रात्री उशिरापर्यंत गणेश मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मध्यरात्रीपर्यंत तब्बल १९६ सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी रवाना झाल्या.
सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी अजिंक्य गणेश व नवरात्र उत्सव मंडळ, आगाशिवनगरचा गणपती चावडी चौकात दाखल झाला. त्यानंतर दिवसभर टप्प्याटप्प्याने गणेश मंडळांच्या मिरवणुका चौकात दाखल होत राहिल्या. सायंकाळी साडेसहापर्यंत ७७ मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी रवाना झाल्या होत्या. याचबरोबर काही घरगुती गणपतींचेही सामूहिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.

सायंकाळी साडेसहा वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते चावडी चौकात गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनीही गणेश मंडळांचे स्वागत केले.

सायंकाळी सात वाजता आमदार डॉ. अतुल भोसले चावडी चौकात दाखल झाले. नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी त्यांचा सत्कार केला. 
शिवाजी गणेश मंडळ, त्रिमूर्ती गणेश मंडळ सोमवार पेठ, न्यू व्यापारी गणेश मंडळ, मोरया गणेश मंडळ मलकापूर, कोल्हाटी समाज गणेश मंडळ आगाशिवनगर, मातानगर गणेश मंडळ कराड, श्री साई गणेश मंडळ चौक आदी मंडळांच्या मिरवणुका रात्री साडेसातपर्यंत प्रीतिसंगम घाटाकडे रवाना झाल्या.

एकता गणेश मंडळ, मलकापूरने धनगरी ढोल आणि लेझीम पथकाच्या सहभागातून पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढली. आमदार मनोज घोरपडे यांनी मंडळाचे स्वागत केले.

रात्री आठपर्यंत १०२, नऊपर्यंत १०६, तर साडेनऊपर्यंत १११ गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी रवाना झाल्या. जय जवान गणेश मंडळ, शुक्रवार पेठने ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक काढत सुवर्णमहोत्सवी वर्षाचा जल्लोष केला. कृत्रिम हत्ती, चार वाद्ये, दोन पालख्या, घोडे व उंटांचा सहभाग असलेली ही मिरवणूक विशेष आकर्षण ठरली. शाही दरबाराच्या स्वरूपातील मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

रात्री साडेआठनंतर चावडी चौकाकडे येणारे सर्व रस्ते नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. ज्योतिर्लिंग गणेश मंडळ, हजारमाचीने मशीनद्वारे गुलालाची उधळण केली. विविध मंडळांच्या मिरवणुकांमध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता.

मध्यरात्री बारा वाजेपर्यंत १९६ गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी रवाना झाल्या. त्यानंतर पोलिसांनी ध्वनिवर्धक यंत्रणा बंद केली. उर्वरित मंडळांनी ‘मोरया मोरया’चा जयघोष करीत पारंपरिक पद्धतीने मिरवणूक पुढे नेली. रात्री १ वाजून २५ मिनिटांनी न्यू सरकार गणेश मंडळ, मलकापूरची मिरवणूक विसर्जनासाठी रवाना झाली. त्यामुळे पहाटेपर्यंत सुरू असलेला गणेश विसर्जन सोहळा भक्तिभाव, उत्साह आणि शिस्तीच्या वातावरणात पार पडला.

 पोलिसांचा चोख बंदोबस्त
जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कोल्हाळ यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले. विसर्जन मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.



No comments:

Post a Comment