Monday, September 28, 2026

कराड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; जलसंधारणाच्या कामांना गती द्या : पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

वेध माझा ऑनलाईन।
 महाराष्ट्र शासनाने राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला असला तरी कराड तालुक्याचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. मात्र तालुक्यातील अनेक भागांमध्ये गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण कराड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात सामाजिक माध्यमावरील आपल्या पोस्टद्वारे चव्हाण यांनी म्हटले आहे की, कराड तालुक्यातील एकूण खरीप क्षेत्र ३२,५०० हेक्टर असून त्यापैकी १३,५०० हेक्टर (४२ टक्के) क्षेत्र सिंचित आहे, तर १९,००० हेक्टर (५८ टक्के) क्षेत्र जिरायत आहे. उंडाळे, येवती, काले, मसूर, इंदोली आणि उंब्रज ही महसूल मंडळे दुष्काळामुळे गंभीररीत्या प्रभावित झाली आहेत. त्यामुळे शासनाने वस्तुस्थितीचा विचार करून संपूर्ण कराड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा.

याचबरोबर राज्यातील ज्या ९३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही, त्या तालुक्यांचा मंडळनिहाय सर्व्हे करण्याची मागणीही त्यांनी केली. या सर्व्हेमध्ये जर बहुसंख्य महसूल मंडळे ‘ट्रिगर-१’ निकषांत बसत असतील, तर संबंधित संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, असेही त्यांनी नमूद केले.

जलसंधारणाच्या उपाययोजनांबाबत बोलताना चव्हाण यांनी नवीन साखळी बंधारे उभारण्यास प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. तसेच विद्यमान बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याची कामे तातडीने सुरू करावीत आणि ही सर्व कामे रोजगार हमी योजना (रोहयो) तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत राबवावीत, अशी मागणी त्यांनी केली.

दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहनही पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहे.

No comments:

Post a Comment