वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला तब्बल 38 दिवसानंतर मुहूर्त मिळाला आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात भाजपचे 10 ते 11 आणि एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या 6-7 मंत्र्यांचे शपथविधी होऊ शकतात. भाजपकडून शपथ घेणाऱ्या 9 मंत्र्यांची नावं आता समोर आली आहेत.
मंत्रिमंडळ विस्ताराआधी आज रात्री 9 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर डिनर डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलं आहे. संभाव्य मंत्र्यांसोबत देवेंद्र फडणवीस डिनर डिप्लोमसी करणार आहेत.
मंगळवारी सकाळी 11 वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपकडून 9 जणांना फोन करण्यात आला आहे. यामध्ये चंद्रकांतदादा पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावीत यांना आतापर्यंत फोन गेला आहे.
भाजपच्या या 9 जणांशिवाय शिवसेना शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत आणि संजय शिरसाट यांना निरोप देण्यात आलेला आहे. संजय शिरसाट हे औरंगाबादहून मुंबईला निघाले आहेत.
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतरचं हे पहिलंच मोठं अधिवेशन असणार आहे, त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार हे मात्र निश्चित आहे
No comments:
Post a Comment