Thursday, August 4, 2022

मुंबई पोलिसांनी तब्बल 700 किलो ड्रग्ज केले जप् ; त्या ड्रग्जची किंमत 1400 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे...

वेध माझा ऑनलाइन - मुंबई पोलिसांनी तब्बल 700 किलो ड्रग्ज जप्त केलेय. या ड्रग्जची किंमत 1400 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मुंबई गुन्हे शाखाचा अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिटने पाच जणांना अटक केली आहे. पुढील कारवाई सुरु आहे. पण, मुंबईमध्ये तब्बल 700 किलो ड्रग्जचा साठा कशासाठी होता? असा प्रश्न उपस्थित झालाय. 

बेकायदेशीररीत्या ड्रग्ज विकून झटपट पैसा कमवण्यासाठी ड्रग्ज विक्रेत्यानं आपल्या उच्च शिक्षणाचा वापर केला. तो मेफेड्रोन (MD) तयार करत होता. पोलीस पथकाला प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार,  मेफेड्रोन ड्रग्सची निर्मिती करणाऱ्या मुख्य आरोपीने रसायन शास्त्रामध्ये ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे शिक्षण घेतलेले आहे. तो वेगवेगळे केमीकल एकत्रित करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करत 'एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ तयार करत होता. त्याने ड्रग्ज तयार करण्याचे ज्ञान आत्मसात केले होते. झटपट पैसा कमवण्यासाठी त्याने जोडीदारांच्या मदतीने ड्रग्जच्या निर्मितीला सुरुवात केली होती. 

मुंबई गुन्हे शाखाचा अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिटने पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 701 किलो 740 ग्रॅम वजनाचं ड्रग्सज जप्त केलेय. याची किंमत 1403 कोटी 48 लाख रुपये आहे. आरोपी हे मुंबई शहर व परिसरात मोठया प्रमाणात अंमली पदार्थाची पुरवठा करणार होते.  अंमली पदार्थाची निर्मिती, अवैधपणे करुन त्याचा व्यापार करणाऱ्या मोठया टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय.  एएनसीच्या अधिकाऱ्यांनी गोवंडीतील शिवाजी नगर येथून मार्च 2022 मध्ये पहिल्या आरोपीला अटक केली.  त्याच्याकडून 250 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले. आरोपींकडे अधिक चौकशी करून पोलिसांनी पुरवठा साखळीचा संबंध प्रस्थापित केला. त्यामुळे या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, जे घाऊक पुरवठादार आहेत.

आरोपी हा मागणीप्रमाणे 'एम.डी.' (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विकत होता. तो फक्त 250 ग्रॅमपेक्षा जास्त ड्रग्जचा व्यवहार करत होता. तसेच स्वत:ची ओळख लपविण्यासाठी सदर आरोपी वेगवेगळ्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचा वापर करत असल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी नालासोपारा येथील एका कारखान्याचा पर्दाफाश करून अमली पदार्थ जप्त केले आहेत. यापूर्वी आरोपींनी मुंबई आणि उपनगरात चार ते पाच वेळा एवढा मोठा माल पुरवठा केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा एन.डी.पी.एस. कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment