राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाची दोन शकलं झाली. अजित पवार यांनी मूळ पक्षावर दावा केला तर शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार नावाने पक्ष पुढे न्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं समोर येत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या उघड उघड वाद होताना दिसत आहे. शरद पवार यांच्यासाठी ही नवी डोकेदुखी आहे.
राष्ट्रवादीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जयंत पाटील यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. मात्र पक्ष संघटनेत काम करण्यावरुन जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्या संघर्ष होताना पहायला मिळत आहे. जयंत पाटील यांच्या न ऐकण्याच्या भूमिकेमुळे रोहित पवार संतप्त झाल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत हा वाद आता आणखी चिघळताना पहायला मिळत आहे.
रोहित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जयंत पाटील यांना बदलण्याची मागणी केली होती. शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांच्याकडे पक्ष संघटनेची जबाबदारी द्यायला हवी, अशी उघड भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर या वादाने आणखीनच पेट घेतला. आता जयंत पाटील गटाच्या लोकांनी देखील यावर बोलण्यास सुरुवात केली आहे.
काय केलं ट्विट
जयंत पाटील यांच्या जवळचे आणि पक्षाचे अधिकृत प्रवक्तेपद असलेल्या भूषण राऊत यांच्या वक्तव्याने या वादात तेल ओतण्याचं काम केलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद हे कोंबड्या सांभाळण्याइतकं सोपं नाही, असं ट्वविट भूषण राऊत यांनी केलं आहे. रोहित पवार बारामती अॅग्रोच्या माध्यमातून पोल्ट्रीशी संबंधित व्यवसाय करतात, त्याला धरुन त्यांनी हे ट्विट केलं आहे. कोंबड्या साभाळणारे असं म्हणून त्यांनी एक प्रकारे रोहित पवार यांना त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
पक्षसंघटनेच्या वर्चस्वावरुन राष्ट्रवादीत संघर्ष होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी राष्ट्रवादी एकसंध असताना सुद्धा जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात संघटनेच्या वर्चस्वावरुन शीतयुद्ध रंगलं होतं. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अजित पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांची पदं काढून घेतल्याची तसेच संधी न दिल्याची उदाहरणं सांगितली जातात. अजित पवारांचे समर्थक संग्राम कोते यांनी तर या कारणामुळे काही काळ राजकारणापासून अलिप्त होण्याचा निर्णय घेतल्याचं सुद्धा सांगितलं जातं.
दरम्यान, आता अजित पवार यांनी आपला गट वेगळा केल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षात पुन्हा तोच वाद नव्याने सुरु झाला आहे. अजित पवार यांची जागा फक्त आता रोहित पवार यांनी घेतली आहे. अहदनगरच्या सभेत रोहित पवार यांनी जयंत पाटलांना थेट इशारा दिला आणि जयंत पाटील यांनी सुद्धा त्यावर भाष्य केलं, मात्र या दोन नेत्यांमध्ये सुरु असलेली वर्चस्वाची लढाई कोण जिंकणार?, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.
No comments:
Post a Comment