Saturday, June 15, 2024

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयरेचा जीआर काढलात तर, गंभीर परिणाम होतील ; ओबीसी नेत्याने दिला सरकारला इशारा ;

वेध माझा ऑनलाइन
राज्यात ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत 'चुन चुन के गिरायेंगे' असा निर्वाणीचा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयरेचा जीआर काढलात तरी आगामी निवडणुकीत त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. ते शनिवारी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली.

राज्य सरकार हे ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करत आहे. या मुद्द्यावरुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सरकारची आहे. राज्य सरकारकडून आम्हाला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही कोणत्याही बैठकीला जाणार नाही. जालन्यातली वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी प्राणांतिक उपोषण सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना प्रकाश शेंडगे यांनी म्हटले की,  ओबीसी उपोषण राज्यभर पेटेल. ओबीसी आरक्षणावरुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी सरकारची असेल, असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले.

No comments:

Post a Comment