Friday, June 14, 2024

नवजा येथे 45...तर महाबळेश्वर येथे 30 ...आणि कोयनानगर येथे 31 मिलीमीटर पावसाची नोंद: कोयना धरणात किती tmc पाणीसाठा ?

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्ह्यात पावसाने सध्या उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पेरणीची कामे केली जाऊ लागली आहेत. मागील चार पाच दिवस झाले पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, कोयना धरणासह नवजा, महाबळेश्वर या ठिकाणी देखील पावसाची संतधार सुरु आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक 45 तर महाबळेश्वर येथे 30 आणि कोयनानगर येथे 31 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पूर्व भागातही तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. सध्या कोयना धरणाचा पाणीसाठा 15.05 टीएमसी इतका झाला आहे.

पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजासह कांदाटी खोऱ्यात पावसाने मागील आठवड्यात दमदार हजेरी लावली. त्यामुळे ओढे, नाले वाहू लागले आहेत. तसेच भात खाचरातही पाणी साचले. यामुळे शेतकऱ्यांची भात लागणीची गडबड सुरू झाली आहे. तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाने लावलेल्या हजेरीमुळे भुईमुगासह सोयाबीन आदी बियाणांची ठिकणी, पेरणीची कामे शेतकऱ्यांनी सुरु केली आहेत.

एक जूनपासून कोयनेला १८१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर नवजाला २२८ आणि महाबळेश्वर येथे १८३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाला हाेता. तरीही २१जूननंतरच मोठ्या प्रमाणात पावसाला सुरूवात झाली होती. त्यामुळे मागीलवर्षी १२ जूनपर्यंत पाऊस कमी होता. त्यावेळी कोयनानगर येथे १२, नवजाला २१ तर महाबळेश्वर येथे सर्वाधिक ३६ मिलीमीटर पाऊस पडलेला होता.


No comments:

Post a Comment