बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांना धूळ चारल्यानंतर शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतही त्यांना शह देण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी शरद पवार आजपासून तीन दिवस बारामती तालुका पिंजून काढणार आहेत.
निंबुत या गावापासून शरद पवार यांच्या तीन दिवसीय दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यांच्या दौऱ्यात युगेंद्र पवार देखील सहभागी होणार आहेत. दरम्यान, मागच्या आठवड्यात शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदार संघातील चार मतदार संघाचा दौरा केला होता. आता ते संपूर्ण तालुका पिंजून काढणार असल्याची माहिती मिळत आहे. अशातच, विधानसभा निवडणुकांपूर्वी थोरले पवार अजितदादांना मोठा शह देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या संपूर्ण बारामतीसह राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
बारामती म्हणजे, पवार आणि पवार म्हणजेच बारामती, असं समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात गेली अनेक वर्ष रंगल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात बारामतीतून केली. पण काही काळानंतर शरद पवारांनी बारामतीची धुरा अजितदादांच्या खांद्यावर सोपवली. त्यानंतर मात्र, शरद पवारांच लक्ष बारामतीकडे होतं, पण त्यांनी असा बारामतीचा भाग कधीच पिंजून काढला नव्हता. पण, आजची परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादीत फूट पडली असून राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. एक थोरल्या पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि दुसरा शरद पवारांचे पुतणे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. अशातच यंदाची विधानसभा नाही म्हटलं तरी, दोन्ही पवारांसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे.
अजित पवारांना शह?
35 वर्षांपूर्वी शरद पवार यांनी बारामतीचा कारभार अजित पवार यांच्याकडे सोपवल्यावर कधीच असा बारामतीचा भाग पिंजून काढला नव्हता, असं राजकीय विश्लेषक सांगतात. मात्र, आता शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 48 हजारांचं मताधिक्य मिळाल्यानं अजित पवारांच्या समोर विधानसभेला मोठं आव्हान असणार आहे. आता खुद्द शरद पवार बारामती तालुका पिंजून काढत असल्यानं अजित पवारांच्या अडचणी वाढणार आहेत.
No comments:
Post a Comment