वेध माझा ऑनलाइन। लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. ही संपूर्ण निवडणूक ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या साह्याने घेण्यात आली. मात्र, यावरच टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी संशय व्यक्त केला आहे. एलॉन मस्क यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली होती. यानंतर भारतात अनेक राजकीय नेत्यांनी त्यावर आपलं मत व्यक्त केलं. त्यात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा देखील समावेश आहे.
एलॉन मस्क भारतात आले तर, निवडणूक आयोग त्यांना अटक करेल असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. त्यांच्या या विधानाचा आता भाजपने समाचार घेतला आहे. आज (17 जून) भाजप नेते नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल केला.
आजच्या सामना अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. राणे हे सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. या विजयानंतर नारायण राणे यांनी कोकणात शिवसेना संपली असं विधान केलं होतं. त्याला आजच्या सामना अग्रलेखातून सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे.आता याला देखील नितेश राणे यांनी जवाब दिला आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांना थेट आव्हान दिलं आहे. “भाजपाच्या कार्यालयात आम्हाला म्याव म्यावचा आवाज येत नाही. एलॉन मस्कचा आधार घेण्यापेक्षा वरळीमध्ये काय सुरूये, त्याकडे लक्ष द्या. तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर वरळीतून उभा राहून दाखव.”, असं आव्हानच नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं आहे.
कोकणच्या जनतेची माफी मागा
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला. “जनेतेने शिवसेनेला नाकारलं हे सत्य राणे साहेबांनी सांगितलंय त्यामुळे संजय राऊत व विनायक राऊत यांना मिरच्या झोंबल्या आहेत. कोकणातला सामान्य मतदार हा पैसा खातो असं राऊत आणि ठाकरेंना वाटतं का? आमच्या कोकणातील जनतेचा अपमान कोण करत असेल तर आमची जनता त्यांना गाडून टाकेल, उद्धव ठाकरे यांना कोकणातील जनता समजली नाही”, असा टोला यावेळी नितेश राणे यांनी लगावला आहे.तसंच पुढे ते म्हणाले की, सामान्य मतदारांचा अपमान करण्याचं काम उद्धव ठाकरेंचे कारटे करत आहेत. उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी. परत आम्ही कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही, असा इशाराच यावेळी नितेश राणे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment