- ज्या शाळा व्यावसायिक हेतूने वह्या, पुस्तके, स्टेशनरी, बूट, ड्रेस विकत आहेत, पालकांना ठराविक दुकानातून किंवा शाळेतून साहित्य घेण्याची सक्ती करत आहेत अशा शाळांवर महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम आणि सीबीएसइ, स्टेट बोर्डाच्या नियमानुसार त्वरीत कारवाई करावी, आदींसह विविध मागण्यासाठी कराड येथील शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटनेच्या वतीने सोमवारपासून उपोषण सुरु करण्यात आले आहे.
कराड शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सोमवारी सकाळी अकरा वाजता दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून तेथे उपोषणास सुरुवात करण्यात आली.
तत्पूर्वी पदाधिकाऱ्यांच्या वतीने नायब तहसीलदार (महसूल) महेश उबारे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
व्यावसायिक हेतूने शैक्षणिक साहित्याची विक्री करणाऱ्या दोषी शाळांवर कठोर कारवाई करावी. पालकांना ठराविक दुकानातून किंवा शाळेतून साहित्य घेण्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी. शाळांनी कमिशनसाठी लावलेली महागडी खासगी प्रकाशनाची पुस्तके त्वरीत बंद करावीत सीबीएसईसाठी एनसीईआरटी बोर्डाचीच पुस्तके तसेच स्टेट बोर्डासाठी बालभारतीचीच पुस्तके लावणे बंधनकारक करावीत. प्रत्येक शाळेने शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी किमान दोन महिने आधी आवश्यक पुस्तके आणि वह्यांची यादी जाहीर करावी. पालकांना शैक्षणिक साहित्य खुल्या बाजारातून कोठेही खरेदी करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे परिपत्रक शाळेने पालकांना लेखी स्वरुपात द्यावे. बेकायदेशीर विक्री करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द किंवा दंड करण्याची कारवाई व्हावी. शाळा आणि विशिष्ठ पुस्तक विक्रेते यांच्यातील आर्थिक व्यवहाराची शिक्षण विभागातर्फे चौकशी व्हावी. पालकांसाठी एक स्वतंत्र हेल्पलाईन नंबर किंवा तक्रार निवारण केंद्र कायमस्वरुपी सुरु करावे आदी मागण्यासाठीभे आंदोलन करण्यात आले.
No comments:
Post a Comment