वेध माझा ऑनलाइन। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी पुढाकार घेतला असून, कराड उत्तरसाठी तब्बल १७६ नवीन डी.पी. मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतीसाठी ९७ तर गावठाण अंतर्गत ७९ डी.पी. बसविण्यात येणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा पूर्णतः ग्रामीण व शेतीप्रधान भाग असून या भागातील बहुतांश नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताना वारंवार मोटार ट्रिप होणे, लाईट जाणे, डी.पी. जळणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे शेतीच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत होते.
या समस्येची गंभीर दखल घेत आमदार मनोजदादा घोरपडे यांनी शेतातील जुने व कमी क्षमतेचे डी.पी. बदलण्याचे काम हाती घेतले आहे. ज्या ठिकाणी ६० क्षमतेचे डी.पी. आहेत त्या ठिकाणी आता १०० क्षमतेचे डी.पी. बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे अतिरिक्त वीज भार कमी होऊन वीज पुरवठा अधिक सुरळीत व अखंडित होणार असल्याची माहिती आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.
ग्रामीण भागातील गावठाण क्षेत्रातही वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून वारंवार वीज खंडित होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत होता. ही समस्या दूर करण्यासाठी गावठाण अंतर्गतही मोठ्या प्रमाणात नवीन डी.पी. बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये अतित अंतर्गत ८, खोजेवाडी अंतर्गत ८, काशीळ अंतर्गत ८, नागठाणे अंतर्गत ४, तारगाव अंतर्गत १०, किरोली अंतर्गत ११, आर्वी-नागझरी अंतर्गत ८, वाठार किरोली अंतर्गत ९, पाल अंतर्गत ६ तसेच मसूर अंतर्गत ७ डी.पी. मंजूर करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कराड उत्तरमधील शेती व गावठाण परिसरातील वीज पुरवठा अधिक सक्षम होऊन शेतकरी व ग्रामस्थांना मोठा लाभ होणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment