Monday, May 25, 2026

एकनाथ शिंदेंच्या आमदारांची हॉटेलात गुप्त बैठक; महत्वाची माहिती आली समोर! भाजपला बसणार धक्का !

वेध माझा ऑनलाईन।
जळगावमध्ये शिंदे गटातील आमदारांची एक गुप्त बैठक झाली आहे. एका खासगी हॉटेलमध्ये ही बैठक झाली असून तिला मंत्री गुलाबराव पाटील हेदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इथे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगावमधील एका खासगी हॉटेलात शिवसेना आमदारांची गोपनीय बैठक झाली आहे. या बैठकीनंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्यासह शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल पाटील उपस्थित होते. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्जा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु जळगावची जागा मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या जागेवरून ते आपल्या मुलाला संधी द्यावी, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे भाजपानेही या जागेवर दावा केला आहे. त्यामुळेच आता भाजपा आणि शिंदे गटाची रस्सीखेच सुरू असताना आता जळगावात झालेली ही गुप्त बैठक चर्चेचा विषय ठरली आहे.

काय आहे माहिती...
जळगाव विधान परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटलांसह शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचं एकमत झालं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जळगाव विधान परिषदेची जागा ही शिवसेनेलाच मिळायला पाहिजे, यावर शिवसेनेचे आमदार ठाम आहेत. महायुतीमध्ये जळगावची जागा शिवसेनेला मिळाली नाही तर भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत देऊ, असा निर्णय या बैठकीमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी घेतला आहे.
भाजपप्रमाणेच जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची देखील ताकद, त्यामुळे कुठलीही तडजोड करणार नसल्याची भूमिका या बैठकीमध्ये आमदारांकडून घेण्यात आली आहे. दरम्यान या बैठकीनंतर आता जागा शिवसेनेला द्यावी, अथवा मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी देण्याबाबतची आग्रही भूमिका मांडण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना आमदारांचे शिष्टमंडळ उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे, यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

No comments:

Post a Comment