Friday, May 1, 2026

पेट्रोल डिझेलचे दर वाढणार ? काय आहे कारण ?

वेध माझा ऑनलाईन।
युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी केल्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. जगाला जेवढ्या प्रामाणात कच्चं तेल आणि एलपीजी गॅसची गरज आहे, त्यातील तब्बल 25 टक्के कच्चं तेल आणि गॅसची वाहतूक या मार्गाने होते. तर भारताला आवश्यक असणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी सुमारे 40 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होते. मात्र सध्या हा मार्ग बंद असल्यामुळे आखाती देशातून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. याचा सर्वाधिक फटका हा भारतला बसला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज मार्गे येणाऱ्या कच्च्या तेलाच्या प्रमाणात तब्बल 61 टक्के एवढी घट झाली आहे. परिणामी कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढताना दिसत आहेत
या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने वाढत असल्यामुळे सरकार पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या दरात वाढ करण्याचा विचार करत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये 4-5 रुपये प्रति लिटरने वाढ होऊ शकते. तसेच घरगुती एलपीजी गॅसच्या दरात प्रति सिलिंडर 40 ते 50 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक सिलिंडरमध्ये सातत्याने वाढ सुरूच आहे. 

No comments:

Post a Comment