कराड तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता आक्रमक भूमिका घेतली असून, तालुक्यात मंडल निहाय दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र, आमदार अतुल भोसले यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करून कराडचा दुसऱ्या टप्प्यात दुष्काळी भागात समावेश होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मग काँग्रेसला ही मागणी करण्यास उशीर झाला नाही का? असा सवाल ‘वेध माझा’ने काँग्रेसचे राज्य सचिव अजितअप्पा पाटील-चिखलीकर यांना केला.
यावर उत्तर देताना अजितअप्पा पाटील-चिखलीकर यांनी थेट भूमिका मांडली. “अतुलबाबांच्या मागणीमुळे कराड तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला तर आम्ही त्यांचे जाहीर अभिनंदन करू. मात्र, तसे झाले नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल,” असा इशारा त्यांनी दिला.
कराडच्या पाटण कॉलनीतील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकारकडून कराड तालुक्याचा दुसऱ्या टप्प्यात दुष्काळी भागात समावेश होण्याचे संकेत दिले जात असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर अजितअप्पा पाटील म्हणाले, “नुसते संकेत देऊन काय करायचे? दुष्काळ जाहीर होईल तेव्हा बघू!”
“अतुलबाबांच्या मागणीने कराडला दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केले गेले, तर आम्ही त्यांचे जाहीर अभिनंदन करू. पण तसे झाले नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कराड तालुक्यातील उत्तर भागातील 28 गावे, पश्चिम भागातील 23 गावे तसेच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक भाग पावसापासून वंचित राहिले आहेत. जवळपास 45 दिवस पावसाने दडी मारल्याने या भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचा दावा अजितअप्पा पाटील यांनी यावेळी केला.
“शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असताना या भागाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. जिल्ह्यातील मंत्र्यांनी आपापले तालुके वाटून घेत दुष्काळ जाहीर करून घेतला मात्र कराडला वाली कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कराड तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी आमदार अतुल भोसले यांनी पाठपुरावा केला असल्याचा दावा होत असतानाच काँग्रेसने त्यांच्या कार्यपद्धतीवरही निशाणा साधला.
“आपल्या भागाला कोणी वाली नाही. आमदार जिल्हा बँकेच्या निवडणुकीत व्यस्त आहेत,” असा आरोप करत कराड तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अजितअप्पा पाटील यांनी केली
दरम्यान
कराडमध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. एकीकडे आमदार अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून दुसऱ्या टप्प्यात कराडचा समावेश होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनेही ही मागणी लावून धरली आहे काल पृथ्वीराज चव्हाण यांनी ही मागणी केली तर आज काँग्रेसचे राज्य सचिव अजितअप्पा चिखलीकर यांनीही पुन्हा हीच मागणी लावून धरत नुसते आश्वासन नको तर कराडमध्ये ‘दुष्काळ जाहीर होतो की नाही ते बघू’ अशी भूमिका घेतली आहे.
त्यामुळे एकूणच कराड तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष प्रत्यक्ष दुष्काळ जाहीर होण्याच्या निर्णयाकडे लागले आहे.
No comments:
Post a Comment