वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षण आंदोलन आता राज्यात आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज मंगळवारी (1 नोव्हेंबर)आठवा दिवस आहे. आज सरकारने काही निर्णय न घेतल्यास जलत्याग करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. त्यातच, त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्यावर, भाजप नेते नितेश राणे यांनी जरांगे पाटलांंना प्रत्युत्तर देत, “पहिल्या दिवसापासून शांततेची भाषा करणारे जरांगे पाटील आता राजकीय बोलू लागले आहेत, त्यांचा बोलविता धनी कोण आहे?”असा सवाल उपस्थित केला आहे. जरांगे पाटील यांनीही नितेश राणे यांच्यावर पलटवार केला आहे.
बीड मध्ये मराठा आंदोलनाला आलेल्या हिंसक वळणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनांशी संबंधित लोकांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. फडणवीस यांनी ‘शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, हिंसेला कुठेही थारा देण्यात येणार नाही.’ असे विधान केले होते. त्यावर, मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत फडणविसांवर टीका केली. जरांगे पाटील यांच्या टीकेला उत्तर देत नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांच्यावर, “जरांगे पाटील यांचे हिंसेला समर्थन आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
नितेश राणे यांनी समाजमाध्यमांवर व्हिडिओ पोस्ट करत जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, “पहिल्या दिवसापासून शांततेची भाषा करणारे जरांगे पाटील आता राजकीय बोलू लागले आहेत. ज्या समाजकंटकांनी हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला… लोकांची घरं जाळली… आमदारांची घरं पेटवली, तोडफोड केली, कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतली, त्याच्याविरुद्ध गृहमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कडक भूमिका घेतली. आता त्या भूमिकेला समर्थन करण्यापेक्षा जरांगे पाटील यांनी फडणविसांवर टीका केलेली आहे. याचा असा अर्थ होतो का की, जरांगे पाटील ह्या हिंसेचं समर्थन करत आहेत? त्यांची स्क्रिप्ट कुठून तरी लिहून येत आहे? जर असं होत असेल राज्य सरकार म्हणुन आणि मराठा समाज म्हणुन याबद्दल आम्हाला विचार करायलाच लागेल, एवढंच मी जरांगे पाटील यांना सांगेन.”
No comments:
Post a Comment