वेध माझा ऑनलाइन - भाजप आमदार नितेश राणे यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आणि नितेश राणेंना 10 दिवसांत न्यायालयासमोर शरण येण्यास सांगितले. त्यानंतर आज नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी नियमित जामीनासाठी अर्ज केला. नितेश राणे यांच्यासोबत माजी खासदार निलेश राणे हे सुद्धा न्यायालयात उपस्थित होते. यासोबतच त्यांचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने न्यायालयाच्या बाहेर उपस्थित होते. कार्यकर्त्यांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा न्यायालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. यावेळी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. सरकारी वकील प्रदीप घरत अनुपस्थित राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
यावेळी झालेल्या सुनावणी दरम्यान युक्तीवाद झाला. आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची गरज नसल्याचं त्यांच्या वकीलांनी म्हटलं. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या संरक्षणाचा कोर्टात उल्लेख केला यावेळी खानविलकर निकालाचा दाखलाही नितेश राणेंच्या वकीलांनी दिला.
काय आहे प्रकरण?
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचा कट रचण्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप परब यांनी केला आहे. या हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचतात, याचे पुरावे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. त्यामध्ये काही कॉल डिटेल्सचाही समावेश होता. त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश राणे यांचा फोन जप्त करणं गरजेचं आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेत हवे आहेत, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. हा दावा मान्य करत कोर्टानं नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
मिलिंद नार्वेकरांनी खोचक ट्विट करत नारायण राणेंना डिवचलं
सुप्रीम कोर्टाच्या निर्णया नंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी लघु सुक्ष्म दिलासा ! असं ट्विट करून राणेंना डिवचलंय. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष पहायला मिळू शकतो. याआधीच नारायण राणे यांनीही शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर अनेकदा टीका केली होती.
No comments:
Post a Comment