वेध माझा ऑनलाइन - राज्यात कोरोनाची लाट ओसरली असली तरी संकट अजूनही टळलेले नाही. सर्वसामान्यांपाठोपाठ राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पण, कोरोनाची लागण झाली असतानाही सतेज पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे समोर आले आहे.
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द सतेज पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे.
'आत्ताच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरीच उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी' असं आवाहनही सतेज पाटील यांनी केलं.
विशेष म्हणजे काल प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सतेज पाटील हजर होते. एवढंच नाहीतर काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार स्व. चंद्रकांत जाधव यांच्या संकल्पनेतून हुतात्मा पार्क आणि महावीर उद्यान येथील विकास कामांचा शुभारंभ पार पडला. यावेळीही सतेज पाटील हजर होते.
महावीर गार्डन व हुतात्मा पार्कसाठी पहिल्या टप्यात एक-एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, दुसऱ्या टप्प्यात महावीर गार्डनसाठी दोन कोटी तर हुतात्मा पार्कसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सुशोभिकरणानंतर महावीर गार्डन व हुतात्मा पार्क पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरतील, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.
त्याआधी, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोल्हापूर शहरातील स्वातंत्र्य सैनिक गोविंद सदाशिव जोशी व स्वातंत्र्य सैनिक वसंतराव ज्ञानदेव माने यांच्या निवासस्थानी लावण्यात आलेल्या नामफलकाचे अनावरण आज करण्यात आले, याही कार्यक्रमाला सतेज पाटील हजर होते.
.
No comments:
Post a Comment