वेध माझा ऑनलाइन - एन. डी. पाटील यांचे नुकतेच निधन झाले त्यानिमित्ताने शरद पवार सोमवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीतील त्यांच्या घरी आले असता एन डी पाटील यांच्या पत्नी व पवार साहेबांची बहीण असलेल्या माईंचा कंठ दाटून आला. बहिणीला धीर देताना पवारही भावूक झाले. काही मिनिटे दोघेही नि:शब्द झाले. या भावा-बहिणीच्या आसपास असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही यावेळी गलबलून आले. यावेळी पवार यांनी पाटील यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी जागवत माईंसह इतरांचेही सांत्वन केले.
पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी दुपारी एक वाजल्यापासून विविध क्षेत्रांतील मान्यवरांची निवासस्थानी रीघ लागली. येणाऱ्या प्रत्येकाशी माई धैर्याने संवाद साधत होत्या. सायंकाळी ज्येष्ठ नेते पवार आले. त्यांच्यासमवेत जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आदी होते. बंधू पवार यांना पाहिल्यानंतर माईंना गहिवरून आले. त्यांचा आवाज जड झाला. त्यांना पवार यांनी धीर दिला. काहीवेळ ते शांत बसले. उपस्थित सर्वजण भावूक झाले. त्यानंतर माईंनी प्रा. पाटील यांची रुग्णालयातील गेल्या आठवड्याभरातील माहिती दिली. प्रा. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा संवाद सुरू झाला. ‘तुम्हाला हाताला धरून घडविणारे मार्गदर्शक हरपले’ असा उल्लेख पवार यांनी ‘रयत’चे अध्यक्ष अनिल पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांकडे पाहत केला.
No comments:
Post a Comment