Wednesday, January 19, 2022

कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर रोहित आर आर पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळवले दणदणीत यश ; वडिलांची खूप आठवण येतेय ; रोहित पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया...

वेध माझा ऑनलाइन - सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर रोहित आर आर पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या गटाला 17 पैकी तब्बल 10 जागांवर यश मिळालं आहे. खरंतर या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधक आणि रोहित पाटील यांच्यात प्रचंड शाब्दिक खडाजंगी बघायला मिळाली होती. त्यावेळी रोहित पाटील यांनी निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असं वक्तव्य भाषणादरम्यान केलं होतं. अखेर रोहित पाटील यांच्या नेतृत्वात कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. या विजयानंतर रोहित पाटील यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. वडिलांची आज खूप आठवण येत असल्याचं त्याांनी सांगितलं.

रोहित पाटलांची भावनिक प्रतिक्रिया

"मी वडील हा शब्द वापरण्याऐवजी बाप हा शब्द वापरला होता. मी विरोधकांचा भाषणाचा धागा पकडत ते वाक्य बोललो होतो. पण मला आज आबांची आठवण येतेय. कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवण्याचं आबांचं स्वप्न होतं. आबांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं. मी, माझं कुटुंब आणि सर्व कार्यकर्ते आम्ही सगळे आबांना खूप मिस करतोय", अशी भावनिक प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली.

No comments:

Post a Comment