वेध माझा ऑनलाइन - कृष्णा उद्योग समूहाने आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून कराडसह वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्याचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. तांबवे (ता. वाळवा) येथे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेच्या १९ व्या आणि सांगली जिल्ह्यातील पहिल्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
आ. नाईक यांच्या हस्ते आणि सांगली जि.प.चे माजी अध्यक्ष देवराज पाटील व पतसंस्थेचे संस्थापक तथा कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पतसंस्थेच्या नूतन शाखेचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राजारामबापू दूध संघाचे चेअरमन नेताजीराव पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक लिंबाजीराव पाटील, दीपक पाटील, माजी संचालक ब्रम्हानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आ. नाईक म्हणाले, स्व. आप्पासाहेबांनी कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांना समृद्धी मिळवून दिली. त्यांच्याच विचाराने वाटचाल करत कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी नेहमीच सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला सहकार्य केले आहे. कृष्णा हॉस्पिटलच्या आरोग्यसेवेचा लाभही या भागातील लोकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. पतसंस्थेच्या नूतन शाखेमुळे या भागातील लोकांची आर्थिक गरज पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल, असा मला विश्वास वाटतो.
पतसंस्थेचे संस्थापक डॉ. अतुल भोसले यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेताना सांगितले, की गेल्या २० वर्षांत आमच्या पतसंस्थेने सभासदाभिमुख कारभार केला आहे. आजअखेर संस्थेने ३५० कोटींचा व्यवसाय केला असून, येत्या २ महिन्यात ४०० कोटींचा व्यवसाय टप्पा पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. तसेच येत्या काळात संस्थेचा विस्तार करून, लोकांना त्यांच्या विविध गरजांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
यावेळी कृष्णा कारखान्याचे माजी संचालक ब्रम्हानंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील यांनी स्वागत केले. धोत्रेवाडीचे माजी सरपंच प्रदीप माने यांनी आभार मानले. यावेळी तांबवेच्या सरपंच सुषमा भंडारे, धोत्रेवाडीच्या सरपंच वनिता माळी, वाळवा तालुका बाजार समितीचे माजी सदस्य तानाजीराव मोरे, माजी उपसरपंच के. डी. शेळके, पोपटराव जगताप, रामभाऊ माळी, के. के. पाटील, शिवाजी पाटील, मोहनराव जाधव, प्रमोद पाटील, अशोक मोरे, विलास जाधव, विजयकुमार नलवडे, पैलवान संभाजी मोहिते, संभाजी जाधव, धनाजी जाधव, गुलाब चव्हाण, विजय कारंडे, गिरीश जाधव, पोपटराव पवार, वसीम मुल्ला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment