वेध माझा ऑनलाइन - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या १०० कोटींच्या कथित आरोपामुळे राज्यात बरीच चर्चा झाली. या प्रकरणाची ईडीकडून सखोल चौकशी सुरु आहे. त्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देशमुख प्रकरणी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
७ डिसेंबर २०२१ रोजी ईडीकडून सीताराम कुंटे यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यात कुंटे यांनी अनिल देशमुखांबाबत चौकशीत खुलासा केला. देशमुख गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदलीसाठी अनाधिकृत याद्या पाठवायचे अशी कबुली कुंटे यांनी चौकशीत दिली. या यादीत संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठे आणि कोणत्या पदावर बदली करायची याचा उल्लेख असायचा. देशमुख त्यांचे पीए संजीव पालांडे यांच्याद्वारे ही यादी माझ्यापर्यंत पोहचवायचे असं कुंटे यांनी सांगितले.
खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख या याद्या पाठवत असल्याने मी त्यास नकार देऊ शकत नव्हतो असं सीताराम कुंटे यांनी ईडीच्या चौकशीत म्हटलं आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अलीकडेच अनिल देशमुखांनी सचिन वाझेला ओळखत नसल्याचा दावा केला होता. तर या प्रकरणी परमबीर सिंह यांनी माघार घेतली आहे. तेव्हापासून देशमुख जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र आता सीताराम कुंटे यांच्या जबाबामुळे देशमुख यांच्याविरोधात ईडी काय पाऊल उचलणार हे पाहणं गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment