Monday, January 24, 2022

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलावर कृष्णा हॉस्पिटलकडून मोफत उपचार...डॉ अतुल भोसलेंकडून पित्याच्या धाडसाचे कौतुक...तर "त्या' जखमी मुलाच्या प्रकृतीची अतुलबाबानी केली विचारपूस...

वेध माझा ऑनलाइन -  किरपे (ता. कराड) येथील राज धनाजी देवकर (वय ५ वर्षे) या शेतकऱ्याच्या मुलावर नुकताच बिबट्याने हल्ला केला होता. या जखमी मुलावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू असून, या मुलावरील उपचाराचा संपूर्ण खर्च माफ करण्याचा निर्णय कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी घेतला आहे. दरम्यान डॉ. सुरेश भोसले आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी मुलाच्या प्रकृतीची विचारपूस केली असून, बिबट्याशी झुंज देणाऱ्या मुलाच्या वडिलांच्या धाडसाचे कौतुकही केले आहे. 

किरपे येथे २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास शेतीकामासाठी वडिलांसोबत गेलेल्या राज धनंजय देवकर ( वय ५ वर्षे) या मुलावर बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने त्याच्या मानेला पकडून शेतात फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी वडील धनंजय देवकर यांनी बिबट्याशी दोन हात करत आपल्या मुलाला बिबट्याच्या जबड्यातून सहीसलामत सोडविले. मात्र या झटापटीत मुलाच्या मानेला व शरीरावर जखमा झाल्या असून, त्याला उपचारासाठी तातडीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

या प्रकाराची माहिती समजताच कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी जखमी मुलाच्या प्रकृतीची चौकशी करून, त्याच्यावरील उपचारांकडे विशेष लक्ष देण्याची सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. तसेच बिबट्याशी झुंज देणाऱ्या वडिलांच्या धाडसाचे कौतुक करत, या मुलावरील वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण खर्च माफ करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
***

No comments:

Post a Comment