वेध माझा ऑनलाइन - शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या आमदार नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. यानंतर नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या मंगळवारी दुपारी तीन वाजता निकाल देणार असल्याचे जिल्हा न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, जामीन अर्जावर निकाल होईपर्यंत आमदार राणे यांना पोलीस कोठडीत देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली. मात्र ही मागणी जिल्हा न्यायालयाने अमान्य करीत राणे यांना न्यायालयातून जाण्याची मुभा दिली आहे. याबाबतचा निकाल उद्या देणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जिल्हा बँकेच्या निवडणुकी दरम्यान प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नितेश राणे यांनी सादर केलेलं अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना स्थानिक न्यायालयात हजर होण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आमदार राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली आहे.
No comments:
Post a Comment