Tuesday, January 18, 2022

मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यानचा म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण आढळला ; चिंता वाढवणारी बातमी...

वेध माझा ऑनलाइन - राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा हाहा:कार उडालेला असताना मुंबईतून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याची चर्चा सुरु असताना एक अनपेक्षित बातमी समोर आली आहे. मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यानचा म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण आढळला आहे. 

एका 70 वर्षीय वृद्धाला कोरोनावर मात केल्यानंतर म्युकर मायकोसिसची लागण झाली आहे. संबंधित रुग्णाचा 5 जानेवारीला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीला अशक्तपणा जाणवत होता. तसेच त्याच्या रक्तातील साखरेचं प्रमाण थेट 532 वर पोहोचलं होतं. त्यामुळे या रुग्णाला 12 जानेवारीला मुंबई सेंट्रल येथील वॉक्हार्ड्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातील डॉक्टरांनी आवश्यक सर्व चाचण्या तातडीने केल्या. तेव्हा रुग्ण स्टिरॉइड्सवर नव्हता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रुग्णावर उपचार सुरु असताना 14 जानेवारीला डॉ. हनी सावला हे संध्याकाळच्या वेळी रुग्णाच्या तपासणीसाठी गेले तेव्हा संबंधित रुग्णाने आपला गालात दुखत असल्याची तक्रार केली. डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केली तेव्हा त्या रुग्णाच्या गालाला सूज आली होती. डॉक्टरांनी तातडीने एमआयआर केला. पण त्यामध्ये हाडांची कोणत्याही प्रकारे झीज झालेली नाही, असं निष्पन्न झालं.
दुसऱ्या दिवशी रुग्णाला होणारा त्रास आणखी वाढला. चेहऱ्याच्या डाव्या बाजूला प्रचंड सूज आलेली होती. तसेच तो रुग्ण वेदनांनी प्रचंड व्हिवळत होता. याबाबतच्या चाचणी केल्या तेव्हा बुरशीजन्य हायफेची वाढ झाल्याचं समोर आलं. त्यानंतर रात्री 9 वाजूता सुजलेल्या भागातील काही नमुने प्रयोगशाळेत तपासासाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये रुग्णाच्या गालावर काळ्या बुरशीची प्रचंड वाढ झाल्याचं उघड झालं.
डॉक्टरांनी तातडीने रुगणावर आवश्यक सर्व उपचार सुरु केले. सध्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रुग्णावर अद्याप उपचार सुरु आहे. रुग्णाला आणखी पुढच्या काही दिवसांसाठी अँटीफंगल उपचार आवश्यक असतील, असं डॉक्टरांचं सांगणं आहे.

No comments:

Post a Comment