Tuesday, January 18, 2022

आता 12 ते 15 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू होणार ! ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून मिळाली मान्यता...

वेध माझा ऑनलाइन - कोरोनाचा धोका वाढत असतानाच एक दिलासा देणारी बातमी आहे. देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांचं लसीकरण सुरू झालं असून आता मार्चपर्यंत 12 ते 15 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.  NTAGI म्हणजेच लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.

लसीकरणाला गती देण्याची तयारी
15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्चपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे.  त्यानंतर 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू केलं जाऊ शकतं. यासाठी लसही उपलब्ध आहे. 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना लसीसाठी DCFI म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून मान्यता मिळाली आहे.

कोवॅक्सिन लस दिली जाणार?

भारत बायोटेकची कोवॅक्सीन लस 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाऊ शकते. सध्या ही लस १५ ते १८ वयोगटात दिली जात आहे. कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार 15-18 वयोगटातील अंदाजे 7.4 कोटी मुलांपैकी 3.45 कोटींहून अधिक मुलांना आतापर्यंत कोवॅक्सीनचा पहिला डोस देण्यात आला आहे आणि २८ दिवसांच्या अंतराने या मुलांना दुसरा डोस दिला जाईल.

१५ ते १८ वयोगटातील लसीकरण होणार लवकरच पूर्ण

१५ ते १८  या वयोगटातील किशोरवयीन मुले लसीकरण प्रक्रियेत उत्साहाने सहभागी होत आहेत. लसीकरणाची ही गती लक्षात घेता, 15-18 वयोगटातील उर्वरित लाभार्थींना जानेवारीच्या अखेरीस पहिला डोस मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांचा दुसरा डोस फेब्रुवारीअखेर देणे अपेक्षित आहे. अरोरा म्हणाले की 15-18 वर्षे वयोगटाचे लसीकरण झाल्यानंतर, 12-15 वर्षे वयोगटासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी सरकार मार्चमध्ये धोरणात्मक निर्णय घेऊ शकते. 12-15 वर्षे वयोगटातील संख्या अंदाजे 7.5 कोटी इतकी आहे.

No comments:

Post a Comment