वेध माझा ऑनलाइन।
राज्यात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अचानक हवामानात बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळ्याला अजून काही महिने बाकी असतानाच राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या हालचाली वाढल्या आहेत
हवामान खात्याने गुरुवार, 19 मार्च रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे
दिलेल्या माहितीनुसार सध्या मध्य प्रदेश परिसरावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीपासून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे विश्लेषणातून समोर आले आहे. वातावरणात आर्द्रता वाढल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यात जळगाव, नाशिक, अहिल्यानगर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये ताशी सुमारे 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः नाशिक जिल्हा आणि घाटमाथ्यावरील भागांसाठी गुरुवारचा दिवस अधिक संवेदनशील मानला जात आहे.
राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्येही हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. तसेच नागपूर, अकोला, अमरावती आणि गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भ विभागातही यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. या भागांत ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याबरोबरच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment