Tuesday, March 17, 2026

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि नूतन सभापती सौ. नंदाताई यादव यांचे विशेष अभिनंदन ;


वेध माझा ऑनलाईन।
कराड पंचायत समितीत प्रथमच भाजपाची सत्ता आणल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि नूतन सभापती सौ. नंदाताई यादव यांचे विशेष अभिनंदन केले. कराड तालुक्याच्या विकासाला नवी गती मिळवून देण्यासाठी, राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

कराड पंचायत समितीवर तब्बल ६४ वर्षानंतर प्रथमच भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा फडकवला आहे. सोमवारी (ता. १६) झालेल्या निवड प्रक्रियेत भाजपाच्या सौ. नंदाताई यादव यांची नूतन सभापती म्हणून निवड झाली. या निवडीमुळे कराड तालुक्यात भाजपाला नवे बळ मिळाले आहे.

या निवडीनंतर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सौ. नंदाताई यादव यांनी मुंबई येथे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी त्यांचा सत्कार करून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार डॉ. भोसले यांनीही या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत, कराड तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले.

नूतन सभापती सौ. यादव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना जनतेने आणि पक्षाने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. आ.डॉ. अतुलबाबांच्यामुळे मला एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली असून, या पदाला न्याय देत, कराड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे, असे नमूद केले.

दरम्यान, सौ. यादव यांनी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासमवेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील, मत्स्योद्योग मंत्री ना. नितेश राणे, सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाट यांची भेट घेतली. या मान्यवरांनी सभापती निवडीबद्दल सौ. यादव यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, पंचायत समिती सदस्य ॲड. नरेंद्र नांगरे-पाटील, माजी जि.प. सदस्य शंकरराव खबाले, सचिन पाचपुते, अरुण यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment