सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या प्रिया शिंदे विजयी झाल्या तर उपाध्यक्षपदी राजू भोसले विजयी झाले आहेत. भाजपनं जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पराभव केला. यानंतर दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आले. आज जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे आणि उपाध्यक्ष राजू भोसले यांनी कराड येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं. यावेळी प्रिया शिंदे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महेश शिंदे यांची मदत झाल्याचं कबूल केलं. याशिवाय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे पाईक असून त्यामुळंच त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो असल्याचं प्रिया शिंदे म्हणाल्या.
सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया महेश शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे आणि इतर भाजप नेते उपस्थित होते.
प्रिया शिंदे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणिमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्या सहकार्यानं संधी मिळाल्याचं म्हटलं. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. 2014 पासून भाजप सत्तेत आल्यानंतर विकासाचा डोंगर उभा राहिलेला आहे. आमच्या मतदारसंघाची आणि भागाची प्रगती वेगानं झाली आहे. आज प्रथम जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आलेली आहे. देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारानं पूर्ण जिल्हा विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्रात आयडॉल होईल यासाठी जिल्हा परिषद सदस्यांना समवेत घेऊन विकासात्मक आणि संघटनात्मक काम मोठ्या पद्धतीनं करणार आहोत. आमदार महेश शिंदे यांची मदत झालेली आहे. त्यांच्यामुळंच आम्ही इथं आहोत, असं प्रिया शिंदे यांनी म्हटलं.
आम्ही यशवंत विचारांचे पाईक आहोत, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करुन, त्यांचे विचार पुढं नेण्यासाठी, त्यांच्या विचारानं जिल्हा परिषद चालवण्यासाठी त्यांची प्रेरणा घेण्यासाठी इथं आलो आहे. यशवंत विचारांचा खून केल्याचा भाजपवर होणारा आरोप चुकीचा असल्याचं ही प्रिया शिंदे यांनी म्हटलं. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा आदर करुन आमचं प्रत्येक पाऊल असेल, असं शिंदेंनी म्हटलं.
No comments:
Post a Comment