Sunday, March 8, 2026

इराण भारताला कोणती मदत करणार ? घेतला मोठा निर्णय; काय आहे बातमी-?

वेध माझा ऑनलाइन।
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता अनेक देशांनी व्यक्त केली होती.

या पार्श्वभूमीवर इराणने काही दिवसांपूर्वी होर्मुज सामुद्रधुनीबाबत कठोर भूमिका घेतली होती. चीन वगळता इतर देशांच्या तेलवाहू जहाजांना या मार्गातून जाण्यास बंदी घालण्याचा इशारा देण्यात आला होता. या घोषणेमुळे भारतासह अनेक देशांमध्ये इंधन पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली होती.
मात्र आता भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्सने आपला निर्णय बदलत होर्मुज सामुद्रधुनीचा वापर काही देशांसाठी खुला ठेवण्याची घोषणा केली आहे. या नव्या निर्णयानुसार अमेरिका, इस्त्रायल, युरोपियन देश आणि त्यांचे सहयोगी राष्ट्र यांच्यासाठीच हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
यामुळे भारतासारख्या देशांना या मार्गाने तेलाची वाहतूक सुरू ठेवण्याची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे भारतातील संभाव्य इंधन टंचाईचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. जागतिक बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भारतासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

No comments:

Post a Comment