वेध माझा ऑनलाइन
राज्यात मार्चच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळांना सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान झपाट्याने वाढत असून काही भागात उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. राज्यात उन्हाचा कहर वाढत असून नागरिक गरमीने हैराण झाले आहेत. काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट सांगितली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी तापमान 39 ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट नोंदवली गेली. याशिवाय सोलापूर येथे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. वाशीम, वर्धा, अमरावती आणि ब्रह्मपुरी या भागांमध्येही तापमान जवळपास 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याचे नोंदवले गेले आहे. दुसरीकडे निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी तापमान 11.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.
हवामान खात्याने 10 मार्चसाठी कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या कोकणातील जिल्ह्यांसह अकोला, अमरावती आणि वर्धा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय रत्नागिरी, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान तज्ञांच्या मते, बिहारपासून मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे तापमानात वाढ होत आहे. दरम्यान पुढील काही दिवस राज्यात उन्हाचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता सध्या कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment