वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. स्थापनेनंतर प्रथमच सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले आहे. या निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ केवळ 28 सदस्यांपर्यंत मर्यादित असतानाही, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रणनीती आखत अतिरिक्त पाठिंबा मिळवला. त्यांच्या प्रयत्नांमुळे भाजपला एकूण 33 सदस्यांचा पाठिंबा मिळाला आणि सत्ता हस्तगत करण्यात यश आले. या पार्श्वभूमीवर प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, या निकालामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. या निकालाचे पडसाद आता थेट राज्याच्या कॅबिनेट बैठकीत उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे
दरम्यान या बैठकीत शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री प्रशासनाच्या भूमिकेबाबत तसेच भाजपच्या काही मंत्र्यांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त करणार आहेत.
या निवडणुकीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, शेवटच्या क्षणी भाजपने राजकीय डावपेच रचत काही सदस्यांना आपल्या बाजूला वळवले, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या ‘पळवापळवी’मुळे महायुतीतील समन्वयावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे या शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी असल्याने या निकालाला अधिक राजकीय रंग चढला आहे. एका बाजूला भाजपचा विजय, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी, अशा दुहेरी परिस्थितीत साताऱ्यातील राजकारण तापले आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर आक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकीदरम्यान पोलिसांच्या मदतीने राजकीय खेळी करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे हा मुद्दा आता केवळ स्थानिक पातळीवर न राहता राज्याच्या सत्ताकेंद्रात पोहोचण्याची चिन्हे आहेत. येत्या मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री प्रशासनाच्या भूमिकेबाबत तसेच भाजपच्या काही मंत्र्यांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त करणार आहेत. त्यामुळे ही बैठक केवळ नियमित कामकाजापुरती मर्यादित न राहता राजकीय वादांनी गाजण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment