Wednesday, March 11, 2026

कराड शहराच्या वाढीव भागासाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा व भुयारी गटार, मलप्रक्रिया केंद्र आणि ११ लाख लिटरच्या पाणी टाकीच्या कामाचे भूमिपूजन ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत नगराध्यक्ष यादव यांच्या पाठपुराव्याने शहराच्या वाढीव भागासाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेंतर्गत १०.५ एमएलडी क्षमतेचे मलप्रक्रिया केंद्र आणि ११ लाख लिटरच्या पाणी टाकीच्या कामाचे भूमिपूजन पार पडले.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, बांधकाम सभापती अख्तर आंबेकरी, जयवंत पाटील, पाणी पुरवठा सभापती अल्ताफ शिकलगार, नगरसेवक जयंत पाटील, प्रवीण पवार, सुहास जगताप, सुप्रिया खराडे, योगिता जगताप आदी उपस्थित होते.

शहरात भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नसल्याचे सांगत नगराध्यक्ष यादव म्हणाले, शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्या प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. भविष्यातील सुमारे तीन लाख लोकसंख्येचा विचार करून पाणीपुरवठा व ड्रेनेज व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून हद्दवाढ भागात ११ लाख लिटर क्षमतेची उंच पाण्याची टाकी आणि मलप्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे.

या प्रकल्पामुळे दरडोई १४० लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. वारुंजी जॅकवेल येथे चार मोटर बसविण्यात येणार आहेत. भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. अतिरिक्त वाया जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाईल. २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेमुळे पाण्याची बचत होणार आहे. सौरऊर्जेमुळे सुमारे साडेचार कोटी रुपयांची आर्थिक बचत होणार आहे. बाहेरचे नागरिकही शहरातील पाणी पिण्यास येतील. मलप्रक्रिया केंद्र आणि ११ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीची योजना २०२३ मध्येच तयार केली होती. शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पाण्याच्या टाक्यांचेही पुनर्बाधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील ४० वर्षे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहील. शुद्धीकरण प्रक्रियेनंतर नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणार आहे.

माजी मंत्री पाटील म्हणाले, "शहराला कृष्णा आणि कोयना नद्यांचे पाणी उपलब्ध असल्याने शहरवासीय नशिबवान आहेत. नागरीकरण वेगाने वाढत असल्याने पाण्याची मागणीही वाढत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे."

मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर म्हणाले, "उपलब्ध निधीतून शहरातील आवश्यक ठिकाणी ड्रेनेज पंपिंग स्टेशन उभारणे, नवीन यंत्रसामग्री बसविणे आदी कामे करण्यात येतील." नगरसेवक प्रवीण पवार यांनी प्रास्ताविक केले. सुप्रिया खराडे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment