Friday, March 13, 2026

घरगुती ते व्यावसायिक गॅसबाबत सरकारची मोठी कारवाई ; घेतले 10 सर्वात मोठे निर्णय ;

वेध माझा ऑनलाइन।
गॅसच्या अभूतपूर्व टंचाईने राष्ट्र आणि राज्य होरपळले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि खानावळ चालकांना मोठा फटका बसला. तर कामगार बेरोजगारीच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यातच सर्वसामान्यांची दोन वेळच्या जेवणासाठीची कसरत लांबच लांब रांगामधून दिसली. त्यावर मात करण्यासाठी मोदी सरकारने त्यासाठी दहा दमदार निर्णय घेतले आहे.

 गेल्या दोन दिवसांपासून एका गॅस सिलेंडरसाठी जे काही महाभारत सुरू आहे, ते उभा देश पाहत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, चहा, वडापाव आणि इतर खाद्यपदार्थ तयार करणारे छोटे व्यावसायिक, खानावळ चालक हे तर मेटाकुटीला आले आहे. गॅसच उपलब्ध नसल्याने अनेकांनी व्यवसाय बंद केला आहे. त्यामुळे कामगारांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर सर्वसामान्यांच्या रोजच्या कटकटीत अजून एकीची वाढ झाली. त्यांना काम सोडून सिलेंडर बुकिंगसाठी एजन्सीबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहेत. तहानभूक विसरून कुटुंबासाठी अनेकांची जीवघेणी कसरत सुरू आहे. तर या धामधुमीत काळाबाजार आणि हेराफेरी करणाऱ्यांनी हात धुवून घेतले आहे. पण मोदी सरकारने या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी जालीम उपाय केले आहेत.


सरकारचे 10 निर्णय

1). देशभरातली रिफायनरींना LPG उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले. खासगी आणि सरकारी तेल उत्पादक कंपन्यांना घरगुती LPG उत्पादन वाढवण्यास सांगितले. उत्पादन क्षमता वाढवण्यात आली. लवकरच पुरवठा सुरळीत होईल.

2). साठेबाजीला आळा घालण्यासाठी आणि काळा बाजार रोखण्यासाठी बुकिंगमध्ये अंतर वाढवले. गॅस बुकिंगमधील अंतर 21 दिवसांवरून 25 दिवस केले. त्यामुळे एकाच व्यक्तीला अधिक वेळा गॅस बुकिंग करता येणार नाही. गरजूंना गॅस मिळेल.

3). घरगुती LPG, PNG आणि वाहनांसाठीच्या CNG ला सरकारने प्राथमिकता दिली. रुग्णालये, शाळा, आश्रम, वसतिगृह आणि सर्वसामान्यांना गॅस पुरवठ्यात प्राधान्य दिले.

4). व्यावसायिक गॅस पुरवठा पण लवकरच सुरळीत होणार आहे. सध्याच्या पुरवठ्यात 20 टक्के कपात करण्यात आली आहे. तोडगा काढण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत केली.

5). अतिरिक्त उत्पादन झालेले LPG केवळ IOCL, BPCL आणि HPCL कंपन्यांना देण्याचा आदेश दिला. त्यामुळे सर्वसामान्यांना अगोदर गॅस सिलेंडर पुरवठा होईल.

6). देशभरात काळाबाजार रोखण्यासाठी आणि दलालांना चाप बसवण्यासाठी ESMA लागू केला. धाडसत्र सुरू केले. संबंधितांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात आले.

7). आखातातील पुरवठा विस्कळीत झाल्यानंतर पर्यायी मार्ग शोधले. नवीन देशाशी गॅस पुरवठ्याबाबत झटपट करार केले. लवकरच गॅसच्या नवीन खेपा भारतात येतील.

8). रशियाकडून खरेदी वाढवली. या मार्च महिन्यातील सुरुवातीच्या या 11 दिवसात रशियाकडून इंधन खरेदी 50% वाढवली. आयात वाढवून 15 लाख बॅरल प्रति दिवसावर पोहचले. IOC आणि रिलायन्सने 3 कोटी बॅरलसाठी करार केला.

9). LNG साठी अमेरिकेसोबत नवीन व्यापारी करार केला. GAIL ने LNG साठी अमेरिकेसोबत सौदा केला.

10). लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका खंडातील देशाशी इंधन खरेदीसाठी नवीन करार केला. गुयानासोबत पहिल्यांदाच करार करत 40 लाख बॅरल इंधन खरेदी केली. याशिवाय नायजेरिया आणि अंगोला देशाकडून इंधन मागवण्यात आले आहे. ते लवकरच देशात पोहचेल.
मोदी सरकारने हे दहा दमदार निर्णय घेतले आहे.

No comments:

Post a Comment