Tuesday, March 24, 2026

वेध माझा ऑनलाइन।
 कृष्णा नाका ते मंगळवार पेठ रस्त्यावर सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद चालकाने भरधाव वेगात व्हॅन चालवून दोघांना उडवले. यावेळी नागरीकांनी पाठलाग करून व्हॅन अडवली. तसेच चालकाला बेदम चोप देत गाडी उलटवून तोडफोड केली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कृष्णा नाक्यावरून एक व्हॅन सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात मंगळवार पेठेकडे निघाली होती. या व्हॅनने सुरूवातीला सुरय्या शिकलगार (रा. मंगळवार पेठ, कराड) या महिलेला धडक दिली. त्यामध्ये महिला गंभीर जखमी होवून रस्त्याकडेला फेकली गेली. अपघातानंतर चालकाने व्हॅन न थांबवता कन्या शाळेकडे पळ काढला. त्यावेळी दुचाकीस्वार माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे (रा. बुधवार पेठ, कराड) यांनाही व्हॅनची धडक बसली. अपघातात तेही गंभीर जखमी झाले. अपघात निदर्शनास येताच परिसरातील नागरीकांनी व्हॅनचा पाठलाग करून कन्या शाळेनजीक व्हॅन अडवली. त्यांनी चालकाला चांगलेच फैलावर घेतले. त्यावेळी मद्यधुंद स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याला चोप देत नागरीकांनी व्हॅनची तोडफोड केली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी व्हॅन चालक अक्षय संभाजी शेवाळे (वय 30, रा. शेवाळेवाडी-उंडाळे, ता. कराड) याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment