Monday, March 9, 2026

इराण युद्ध सुरु ; भारतात अनेक शहरात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची मोठी गर्दी ; एलपीजी सिलिंडर संदर्भात गोंधळ ;

वेध माझा ऑनलाईन।
इराण युद्ध सुरु असताना भारतात एलपीजी सिलिंडर संदर्भात गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक शहरात आणि गावात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. लोक रिकामे सिलिंडर घेऊन एजन्सीच्या बाहेर उभे आहेत. लवकरात लवकर गॅस सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकारने आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की देशातील एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. मात्र, ही स्थिती मुख्यत्वे घाबरल्यामुळे होत असलेल्या बुकींग आणि काही स्थानिक पातळीवर बुकींगच्या समस्यांमुळे येत आहे.

सोमवारी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात देखील असे प्रकार पाहायला मिळाले आहेत. अनेक लोक आपले रिकामे सिलिंडर घेऊन रांगेत उभे होते आणि गॅस सिलिंडर मिळण्याची वाट पाहात होते. याच धर्तीवर उत्तर प्रदेशातही सीतापूर जिल्ह्यातील बर्डपूर गावातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लोक आपले रिकामे सिलिंडर घेऊन गॅस एजन्सीच्या बाहेर बसलेले दिसत होते.असे म्हटले जात आहे की हा व्हिडीओ सात मार्च रोजीचा आहे. त्यादिवशी मोठ्या संख्येने लोक गॅस सिलिंडरच्या रांगेत उभे होते.
अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे की एलपीजीची वास्तविक कमतरता नाही. अनेक लोकांनी सांगितले त्यांना सहज गॅस सिलिंडर मिळत आहेत. एजन्सीला सिलिंडरचा पुरवठा देखील होत आहे. उत्तर प्रदेशातील एका महिलेने दावा केला की तिला १५०० रुपये देऊन काळ्या बाजारात सिलिंडर खरेदी करावा लागला आहे. महिलेने सांगितले की रमजानचा महिला चालू असून गॅसची गरज जास्त असल्याने मजबूरीमुळे तिला काळ्या बाजारातून सिलिंडर घ्यावा लागत आहे.

गॅस सिलिंडर बुकिंगमधील अंतर वाढवले :

मिळालेल्या माहितीनुसार घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी लागणाऱ्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी दोन सिलिंडर बुकिंगमध्ये किमान 21 दिवसांचे अंतर ठेवणे आवश्यक होते, मात्र आता हे अंतर वाढवून 25 दिवस करण्यात आले आहे. हा निर्णय केंद्रातील पेट्रोलियम मंत्रालय यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. या बदलामागे मुख्य उद्देश म्हणजे बाजारात होणारी साठेबाजी आणि ब्लॅक मार्केटिंग रोखणे हा आहे. 
सरकारकडून असेही स्पष्ट करण्यात आले आहे की देशात सध्या घरगुती गॅस, पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला नाही. तरीही भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या नव्या नियमामुळे ग्राहकांना पुन्हा सिलिंडर बुक करण्यासाठी आधीपेक्षा अधिक दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 गॅस दरवाढीमुळे वाढला आर्थिक ताण 

दरम्यान, पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली, तर व्यावसायिक वापरासाठी असलेल्या सिलिंडरच्या दरात 114.5 रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन च्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली येथे 14.2 किलोचा नॉन-सब्सिडी एलपीजी सिलिंडर आता 913 रुपयांना मिळत आहे. यापूर्वी त्याची किंमत 853 रुपये होती. 

इतर शहरांमध्येही दरवाढ दिसून येत आहे. 

मुंबई येथे नॉन-सब्सिडी एलपीजी सिलिंडरची किंमत 912.50 रुपये झाली आहे. कोलकाता  येथे हा दर 939 रुपये असून चेन्नई मध्ये 14 किलोच्या सिलिंडरसाठी 928.50 रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत वाढून आता 1,883 रुपये झाली आहे. या बदलांमुळे घरगुती बजेटवर तसेच व्यावसायिक क्षेत्रावर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment