वेध माझा ऑनलाइन
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित आरोपी जयराम चाटे याला न्यायालयाने मर्यादित स्वरूपात दिलासा दिला असून काही तासांसाठी जेलबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
धार्मिक विधीसाठी न्यायालयाची मुभा :
संतोष देशमुख हत्या प्रकरणात जयराम चाटे हा आरोपी म्हणून अटकेत आहे आणि त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर सर्व आरोपींना तुरुंगात ठेवण्यात आले असून त्यापैकी एक आरोपी अजूनही फरार असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून त्याचा शोध अनेक महिन्यांपासून घेतला जात असला तरी अद्याप तो सापडलेला नाही.
दरम्यान जयराम चाटे याने आपल्या दिवंगत भावाच्या धार्मिक विधीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्याचा भाऊ श्रीराम चाटे यांच्या बाराव्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी गावात उपस्थित राहण्याची परवानगी मागण्यात आली होती. या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर जिल्हा न्यायालयाने त्याला मर्यादित कालावधीसाठी बाहेर जाण्याची परवानगी मंजूर केली. १३ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत तो पोलिस बंदोबस्तात या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार आहे.
या निर्णयाबाबत सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपीला बाहेर सोडल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद केला होता. मात्र आरोपीच्या वकिलांनी न्यायालयासमोर सर्व अटींचे पालन करण्याची तयारी दर्शवली. तसेच पोलिस बंदोबस्तासाठी लागणारा खर्चही भरण्याची जबाबदारी स्वीकारली.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून मकोका विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी मानवतावादी दृष्टीकोनातून हा निर्णय दिला. त्यामुळे जवळपास १४ महिन्यांनंतर जयराम चाटे काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येणार आहे. मात्र त्याला पोलिसांच्या कडक बंदोबस्तात गावी नेले जाईल आणि धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात आणण्यात येणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण उघड झाल्यापासून कोणताही आरोपी इतक्या कालावधीनंतर बाहेर आला नव्हता, त्यामुळे ही घटना या प्रकरणातील महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
No comments:
Post a Comment