वेध माझा ऑनलाइन।
देशभरातील कोट्यवधी शेतकरी ज्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या पीएम किसान योजनेच्या २२ व्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारकडून या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर करण्यात आली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थी शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी २ हजार रुपयांच्या स्वरूपात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
२ हजार रुपयांचा हप्ता ;
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता १३ मार्च रोजी वितरित केला जाणार आहे. या दिवशी देशभरातील कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपयांची रक्कम थेट जमा केली जाईल. या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विविध खर्चासाठी काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये विविध चर्चा सुरू होत्या. अनेकांनी होळीपूर्वी हा हप्ता जमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र आता कृषी विभागाकडून अधिकृत माहिती देण्यात आली असून होळीनंतर हा हप्ता वितरित केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment