वेध माझा ऑनलाईन - पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणारी घटना मुंबई जवळील डहाणूमध्ये घडली आहे. पाण्याच्या वादावरून महिलांना अश्लील शिवीगाळ करत विवस्त्र होईपर्यंत मारहाण करण्यात आल्याचा संताजनक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डहाणूतील गंजाड नवनाथ कोहराळीपाडा येथे महिलांना अश्लील शिवीगाळ करत महिला विवस्त्र होईपर्यंत या महिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंजाड ग्रामपंचायत हद्दीतील नवनाथ कोहराळीपाडा येथील हा धक्कादायक प्रकार असून पाण्याच्या वादावरून ही घटना घडल्याची माहिती समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांच्या नातेवाईकांकडून ही मारहाण सुरू असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. तसंच महिलांना ही मारहाण होत असताना गंजाड ग्रुप ग्रामपंचायतीचे भाजपचे उपसरपंच देखील या घटनास्थळी दाखल असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
काय आहे प्रकरण?
गंजाड मधील नवनाथ कोहराळीपाडा या ठिकाणी सध्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचे काम सुरू असून या ठिकाणच्या अनेक बोरवेल आणि विहिरींनी तळ गाठला. त्यामुळे याच ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीच्या बोरवेलमध्ये मोटार टाकून काही कुटुंब पाणी घेत होती. मात्र ग्रामपंचायतीने याला विरोध दर्शवला. त्यामुळे या घटनेतून झालेल्या वादाचे रूपांतरण पुढे हाणामारीत झाल्याचं पीडित महिलांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात आता पर्यंत कोणताही गुन्हा डहाणू पोलीस ठाण्यात दाखल झाला नसला तरी समोर आलेल्या या हाणामारीच्या व्हिडीओनंतर पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
No comments:
Post a Comment