वेध माझा ऑनलाइन - गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वातावरणीय बदलांमुळे सर्वत्र सर्दी, ताप, खोकला अशा प्रकारचे संसर्गजन्य आजार उद्भवत आहेत. तसेच अलीकडे कोविडचे रुग्णही काही प्रमाणात आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकप्रकारची धास्ती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. परंतु, कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील विषाणूप्रमाणे पोस्ट कोविड हा तितकासा घातक नाही. हा बहुतांशी वातावरणीय बदलाचा परिणाम असून योग्य उपचारांनी पोस्ट कोविड बरा होत असल्याची माहिती शारदा क्लिनिक एरम हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. चिन्मय एरम यांनी दिली.
कराड येथे शारदा क्लिनिक एरम हॉस्पिटल, कराडच्या वतीने बुधवार दि. 29 रोजी कोविडनंतर रुग्णांमध्ये उद्भवणारे आजार, पोस्ट कोविड आणि वातावरणीय बदलांमुळे उद्भवणाऱ्या विविध आजारांबाबत प्रसारमाध्यमांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निरसनही डॉ. एरम यांनी यावेळी केले.
कार्यशाळेत उपस्थित विविध प्रश्नांच्या उत्तरादाखल बोलताना डॉ. चिन्मय एरम म्हणाले, कोविडनंतर काही रुग्णांमध्ये विविध प्रकारचे आजार उद्भवल्याचे समोर येवू लागले आहेत. कोविडवरील औषोधोपचार, रेमडीसिव्हर, कोविड प्रतीबंधिक लसीकरण व बुस्टर डोस आदींचे दुष्परिणाम रुग्णांवर विविध आजारांच्या माध्यमातून दिसून येत आहेत. त्यात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटनांचे प्रमाण जास्त आहे. परंतु, सदरच्या व्यक्तीचा कोविड व त्यावरील औषधांमुळेच मृत्यू झाल्याचे म्हणता येणार नाही. याबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. परंतु, काहींमध्ये संधिवात, मानेचे व मणक्याचे आजार, त्वचारोग आदींसारखे आजार उद्भवल्याचे दिसून येत आहे. मात्र, सध्या वातावरणीय बदलांमुळे बहुतांश ठिकाणी सर्दी, खोकला व ताप अशा प्रकारचे संसर्गजन्य आजार आढळून येत आहेत. तसेच सध्या पोस्ट कोविडचे काही रुग्ण आढळून येत असल्याने लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. परंतु, हा पोस्ट कोविड पहिल्या लाटेतील कोविड-19, तसेच H1N1 यासारख्या विषाणू इतका घातक नाही. ग्रामीण भागामध्ये बहुतांशी लोक किरकोळ आजारांवर प्राथमिक स्तरावर उपचार घेऊन बरे होत आहेत. त्यातील काही जणांना त्रास झाल्यानंतर किंवा प्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण रुग्णालयांमध्ये ऍडमिट होतात. मात्र, योग्य औषधोपचाराने ते पूर्णपणे बरे होत असून नागरिकांनी पोस्ट कोविडला घाबरून जाण्याची गरज नाही.
पोस्ट कोविडमध्ये प्रामुख्याने मानसिक तणाव आणि शारीरिक कमकुवतपणा हे महत्वाचे दोन घटक आहेत. सध्या संपूर्ण जग खुले झाले आहे. तसेच काही टक्के वगळता लसीकरणही पर्ण झाल्याने पोस्ट कोविडचा तितका प्रभाव पडत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शासकीय आरोग्य योजनांची आर्थिक मर्यादा वाढवावी
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंत सुरक्षा कवच देण्यात येते. तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये पाच लाख रुपयांचे सुरक्षा कवच देण्यात येते. परंतु, जर कुटुंबातील दोन-तीन सदस्य आजारी पडले, तर एका वर्षात सर्वांची मिळून दोन-तीन लाखांपर्यंत मोफत उपचार होऊ शकतात. या योजनांमध्ये ठराविक आजारच समाविष्ट असून त्यामध्ये रुग्णालयात उपचार घेण्याचे दिवस आणि खर्च यावर मर्यादा आहेत. यामध्ये संपूर्ण उपचार मोफत केले जात असून रुग्णांकडून कोणत्याही प्रकारे पैसे घेतले जात नाहीत. परंतु, काही आजारांसाठी रुग्णालयांना शासनाकडून मिळणारा निधी आणि प्रत्यक्षात रुग्णावर होणारा खर्च यामध्ये मोठी तफावत असून अशा आजारांसाठी शासनाने शासकीय आरोग्य योजनांची आर्थिक मर्यादा वाढवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
No comments:
Post a Comment