वेध माझा ऑनलाईन - कराड येथील महामार्गावरील पूल पाडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण या मार्गावर दररोज मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने, त्याचा त्रास नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना होत आहे. या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी पुलाचे काम करणाऱ्या कंपनीचे अधिकारी, तसेच वाहतूक पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन कराड येथे वारंवार उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीवर अखेर निर्णायक तोडगा काढला आहे.
या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार कराड येथे वारंवार उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी दोन महत्वाच्या पर्यायावर चर्चा करण्यात आली. यानुसार कराड येथील जुन्या पुलाचा वापर करून तेथून मलकापूर येथील रस्त्याचा वापर करून, पाचवड फाट्यापर्यंत लाईट मोटार व्हेईकल्सची वाहतूक सुरू ठेवावी. तसेच अवजड वाहनांसाठी 'गोल्डन अवर' निर्माण करून, रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेतच या अवजड वाहनांना वाहतुकीस परवानगी द्यावी, असे या बैठकीत सुचविण्यात आले. डॉ. अतुल भोसले यांच्यासमवेत झालेल्या या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली असून, लवकरच याची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले.
दरम्यान, कराड येथील पुलाचे काम देशातील एक मोठे काम असून, ते सुरळीत पार पडावे यासाठी तसेच नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे. याशिवाय वाहतुकीचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वयंसेवकांची मदत घ्यावी, असेही यावेळी डॉ. भोसले यांनी सुचविले.
बैठकीला डी. पी. जैन समूहाचे प्रदीप जैन, वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेच्या सरोजिनी पाटील, नायब तहसीलदार युवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment