वेध माझा ऑनलाईन - लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या चुलत भावाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांनी शारीरिक त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचललं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी केंद्रीय गृह मंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांचे चुलत भाऊ चंद्रशेखर उर्फ हणमंत पाटील यांनी लातुरातील शिवराज पाटील चाकुरकर यांच्या देवघर येथील निवासस्थानी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. आज सकाळी 9 ते 10 च्या सुमारास ही घटना घडली असून आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
त्यानंतर फॉरेंसिक टीमला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आलं या टीमने देखील काही नमूने घेतले आहेत. या सर्व प्रक्रियेनंतर मृतदेह शवविछेदनासाठी पाठवण्यात आला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांचे चुलत बंधु चंद्रशेखर उर्फ हणमंत पाटील हे 81 वर्ष वयाचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते लातुरात त्यांच्या मुलाच्या घरी राहत होते. दररोज सकाळी ते देवघर येथे येत असत, असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं.
वाढत्या वयासोबत त्यांना अनेक शारीरिक आजार देखील जडले होते. त्यामुळे कदाचित शारीरिक त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचललं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटना घडली त्यावेळी शिवराज पाटील चाकुरकर यांचे सुपुत्र शैलेश पाटील चाकुरकर आणि घरातील नोकर एवढेच उपस्थित होते. शिवराज पाटील चाकुरकर हे दिल्ली येथे असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment