वेध माझा ऑनलाईन - येथील शंभू तीर्थावर स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या बांधकामाचा प्रत्यक्ष शुभारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करवडीचे मठाधिपती विजयलिंग महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक, शिवशंभूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कराडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे, अशी कराडकर नागरिकांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आता पूर्णत्वास जात आहे. या स्मारकासाठी स्थापन झालेल्या स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीने सचिव रणजितनाना पाटील यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुरावामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या स्मारकासाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. निधी मंजूर झाल्यानंतर या स्मारकाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज प्रत्यक्ष स्मारकाच्या बांधकामास प्रारंभ झाला. या कामाची मदत सुमारे दोन वर्षे आहे. या माध्यमातून राज्यातील भव्य स्मारक कराडला उभारण्यात येणार आहे. आज शंभुतीर्थावर मठाधिपती विजयलिंग महाराज यांच्या हस्ते बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी सौ. रूपाली तोडकर व प्रमोद तोडकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. गुढी उभारण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पिसाळ याही यावेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमास स्मारक समितीचे सचिव रणजितनाना पाटील, तसेच घनःश्याम पेंढारकर, एकनाथ बागडी, राजेंद्र माने, राजेंद्रआबा यादव, शिवराज इंगवले, मुकुंद चरेगावकर,महादेव पवार, विष्णू पाटसकर, समितीचे सर्व सदस्य, माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, शहर व तालुक्यातील शिवशंभूप्रेमी तसेच कराड तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment