Monday, March 27, 2023

कृष्णा'ला सहकारातील वैभवशाली कारखाना बनविण्यासाठी प्रयत्नशील : डॉ. अतुल भोसलेगळीत हंगामाची सांगता; १० लाख ६० हजार मे. टन गाळप

वेध माझा ऑनलाइन -  येत्या गळीत हंगामात उसाच्या नोंदीपासून ते ऊस गाळप होईपर्यंत चांगले नियोजन करून शेतकऱ्यांना अधिक चांगला दर द्यायचा आमचा प्रयत्न आहे. कृष्णा कारखान्याला सहकारातील एक वैभवशाली कारखाना बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ च्या ६३ व्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते.

प्रारंभी संचालक बाबासो शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुमन शिंदे यांच्या हस्ते गळीत हंगाम समाप्तीनिमित्त श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली. यावेळी व्हा. चेअरमन जगदीश जगताप, संचालक जितेंद्र पाटील, संजय पाटील, जे डी मोरे, बाजीराव निकम, बाबासो शिंदे, सयाजी यादव, विलास भंडारे, शिवाजी पाटील, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे , प्र.कार्यकारी संचालक मुकेश पवार, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले, माजी पं स सदस्य बाळासाहेब निकम, संजय पवार, टेक्निकल को ऑर्डीनेटर एस डी कुलकर्णी, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

डॉ. अतुल भोसले पुढे म्हणाले, चेअरमन डॉ. सुरेशबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यात संचालक मंडळाने गेली आठ वर्षे उत्कृष्टपणे कारभार केला आहे. आपण कारखाना तांत्रिक दृष्टया आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. येणारा हंगाम लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने वाटचाल करणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑफ सिझनची कामे वेळेत पूर्ण करावी लागणार आहेत. तसेच टप्याटप्याने कारखान्यात सुधारणा कराव्या लागणार आहेत. कारखान्याबरोबरच उपपदार्थ निर्मिती प्रकल्पाचे विस्तारही येत्या काळात करायचे आहेत.

ऊस तोडणी वाहतूकदार यांची बिले वेळेत देण्याबरोबरच हार्वेस्टर मशीनच्या अनुदानासाठी मी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

व्हाईस चेअरमन जगदीश जगताप म्हणाले, या हंगामात नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. त्यामुळे गाळप कमी झाले. परंतु येत्या हंगामात कर्मचाऱ्यांना अधिक चांगले काम करून गळीत हंगाम यशस्वी पार पाडावा लागणार आहे.

कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी.एन देशपांडे म्हणाले, शेतकरी सभासद, तोडणी वाहतूकदार, कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने येणारा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडूया. तसेच आपण सर्वांनी मिळून कृष्णा कारखान्याचे नाव अधिक उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करूयात.

प्र. कार्यकारी संचालक मुकेश पवार यांनी प्रास्तविकात कारखान्याचा गळीत हंगामाचा आढावा सादर केला. ते म्हणाले, कृष्णा कारखान्याने १३० दिवसांमध्ये १० लाख ६० हजार मेट्रिक टन ऊसाचे गळीत केले असून, ११ लाख ७८ हजार २१० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. कारखान्याचा यंदाचा साखर उतारा १२.६१ टक्के इतका राहिला आहे.

यावेळी ऊस तोडणी वाहतूकदार व शेती विभागाचे कर्मचारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शेतकरी सभासद, ऊस तोडणी वाहतूकदार, सर्व अधिकारी व कर्मचारी आदी याप्रसंगी उपस्थित होते. संचालक संजय पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment