वेध माझा ऑनलाईन - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. शूटिंगदरम्यान बिग बींचा अपघात झाला असून ते गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ॲक्शन सीन शुट करताना बिग बींचा अपघात झाला आहे. हैदराबाद याठिकाणी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला आहे. बिग बींच्या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
खु्द्द अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून अपघाताची माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या माहितीनुसार ॲक्शन सीन शुट करताना दुखापत झाली. सध्या बिग बी मुंबईत त्यांच्या निवास स्थानी आराम करत आहेत. अपघातानंतर अमिताभ यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि हैदराबादमधील एआयजी हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन केले आता ते घरी म्हणजेच मुंबईला परतले आहेत. दुखापत बरी होण्यासाठी किमान काही आठवडे लागतील म्हणून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिलंय कि, 'हैदराबाद याठिकाणी शुटिंग सुरु होती तेव्हा ॲक्शन सीन शुट करत असताना मी जखमी झालो आहे. अपघातानंतर शुटिंग रद्द करण्यात आली आहे. डॉक्टरांनी तपासणी केली आणि हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयातील डॉक्टरांनी सीटी स्कॅन केलं आहे. आता मी घरी परतलो आहे. आता काळजी करण्याचं कारण नाही. पण प्रचंड त्रास झाला. हलण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी देखील त्रास होत होता…' असं देखील बिग बी म्हणाले.
पुढे बिग बी म्हणाले, 'प्रकृती स्थिर होण्यासाठी काही आठवडे लागतील. वेदना होत असल्यामुळे डॉक्टरांनी औषधं दिली आहेत. त्यामुळे जी कामे आहेत, ती काही दिवसांसाठी थांबवण्यात आली आहेत. मी आता जलसामध्ये आराम करत आहे. काही महत्त्वाचं काम असेल तरच चालत आहे…' बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगवर त्यांचं हेल्थ अपडेट शेअर केले आहे. तसेच पुढील काही दिवस त्यांचे सगळे शूट रद्द करावे लागले कारण आता दुखापतीतून बरे होण्यासाठी अजून काही आठवडे लागतील.अशी माहिती समोर आली आहे.
तसेच यावेळी बिग बी यांनी चाहत्यांना जलसाबाहेर मी तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही त्यामुळे गर्दी न करण्याचे देखील आवाहन केले आहे. अमिताभ यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ते 26 जुलै 1982 रोजी 'कुली' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी त्यांच्या खालच्या ओटीपोटात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघातातून बरे व्हायला त्यांना बराच वेळ लागला होता.
No comments:
Post a Comment