वेधमाझा ऑनलाईन - महाराष्ट्र विधानसभेमध्ये भटके कुत्रे आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या त्रासावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी त्यांना आसामला पाठवा, कारण आसामची लोक कुत्रे खातात, असं बच्चू कडू म्हणाले. आसाममध्ये कुत्र्यांना 8 हजार रुपयांचा दर मिळू शकतो, यामुळे राज्यातली भटक्या कुत्र्यांची समस्या दूर होईल आणि कुत्र्यांची लोकसंख्याही नियंत्रणात येईल, त्यामुळे कुत्र्यांना आसामला पाठवावं, असं बच्चू कडू म्हणाले.
सध्या फक्त एका शहरासाठीच हा प्रयोग केला पाहिजे, असं मतही बच्चू कडू यांनी मांडलं. बच्चू कडू यांच्या या वक्तव्याचा प्राणी प्रेमी आणि पशू अधिकारांची लढाई लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. बच्चू कडू यांचं विधान अमानवी आणि अपमानकारक असल्याची टीका त्यांनी केली आहे. आमदार प्रताप सरनाईक आणि अतुल भातखळकर यांनी भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबाबतचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता, त्यावर बच्चू कडू बोलत होते.
याआधी झारखंडमध्ये भाजप आमदार बिरंची नारायण यांनीही असंच वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भटक्या कुत्र्यांचा हल्ला रोखण्यासाठी सरकारने उपाय करावेत, अन्यथा नागालँडच्या लोकांना इकडे बोलवा, समस्या दूर होईल, असं बिरंची नारायण म्हणाले होते.
बोकारोचे भाजप आमदार बिरंची नारायण यांनी झारखंड विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. रांचीच्या डॉग बाईट सेंटरमध्ये रोज जवळपास 300 लोक येतात, असा दावा नारायण यांनी केला. पाळीव प्राणी प्रेमी वैध लायसन्सशिवाय कुत्र्यांना पाळत आहेत. बोकारोमध्ये कुत्र्यांना पकडण्यासाठी, त्यांच्यावर उपाय करण्यासाठी आणि त्यांची नसबंदी करण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही, असं बिरंची नारायण म्हणाले होते.
No comments:
Post a Comment