Friday, April 8, 2022

आता 18 वर्षांवरील व्यक्तीलाही मिळणार बूस्टर डोस...

वेध माझा ऑनलाइन - कोरोनाविरोधातील भारताच्या लढ्यातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 18+ लोकसंख्येच्या गटासाठी देखील बुस्टर डोस दिला जाणार आहे. 10 एप्रिल 2022 पासून या वयोगटातील व्यक्तींना का अर्थात बुस्टर डोस घेता येणार आहे. दरम्यान हा डोस या वयोगटासाठी सध्या खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध केला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे.

कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेदरम्यान केंद्राकडून उचलण्यात आलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. याआधी केंद्र सरकारने आरोग्य कर्मचारी आणि 60 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी कोरोना व्हॅक्सिनच्या बूस्टर डोसची मंजुरी दिली होती.

बुस्टर डोस घेण्यासाठी काय आहेत अटी?
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांचे वय 18 वर्षे आहे आणि ज्यांना कोरोना व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिने पूर्ण झाले आहेत, ते खाजगी लसीकरण केंद्रांमध्ये या खबरदारीच्या डोससाठी पात्र असतील.

आरोग्य मंत्रालयाकडून हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, पात्र लोकसंख्येला दिला जाणारा पहिला आणि दुसरा कोरोना डोस त्याचप्रमाणे आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाइनवर काम करणारे कर्मचारी आणि 60+ नागरिकांना देण्यात येणारा बुस्टर डोस पूर्वीप्रमाणेच दिला जाईल. अर्थात या प्रक्रियेसाठी सरकारी लसीकरण केंद्रांद्वारे सुरू असलेला मोफत लसीकरण कार्यक्रम सुरू राहील आणि त्याला गती दिली जाईल अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment